‘रामायण’च्या टीझरमध्ये फक्त 4 सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; रावणाच्या भूमिकेतील यशचा लूक

हनुमान जयंतीचं निमित्त साधत नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीर कपूरने प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली आहे. तर रावणाच्या भूमिकेतील अभिनेता यशचीही झलक यात पहायला मिळतेय.

रामायणच्या टीझरमध्ये फक्त 4 सेकंदांची झलक, तरी तुफान चर्चा; रावणाच्या भूमिकेतील यशचा लूक
Yash as Ravan in Ramayana
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 02, 2026 | 3:38 PM

रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वांत मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या ‘रामायण’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत निर्मात्यांनी या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाची भव्यदिव्य झलक दाखवली आहे. या टीझरमधील प्रत्येक गोष्ट अत्यंत भव्य पद्धतीने चित्रित झाल्याचं दिसून येत आहे. तर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत अभिनेता रणबीर विशेष लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या या लूकचं नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होत आहे. या भूमिकेसाठी रणबीर गेल्या काही महिन्यांपासून कठोर मेहनत घेत होता. ‘रामायण’च्या या टीझरमध्ये रणबीरसोबतच आणखी एका अभिनेत्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा अभिनेता दाक्षिणात्य सुपरस्टार यश असून त्याने यामध्ये रावणाची भूमिका साकारली आहे.

2 मिनिट 38 सेकंदांचा हा टीझर आहे आणि त्यातही रावणाची झलक फक्त चार सेकंदांसाठी पहायला मिळते. विशेष म्हणजे यामध्ये रावणाच्या भूमिकेतील यशचा चेहरा दिसत नाही, तर फक्त त्याची पाठ दिसते आणि त्यानंतर पुष्पक विमानाचं दृश्य पहायला मिळतं. टीझर प्रदर्शित होताच यशच्या या पाठमोऱ्या सीनविषयी सोशल मीडियावर तुफान चर्चा होऊ लागली आहे. ‘केजीएफ’ स्टार यशची फक्त चार सेकंदांची झलक दाखवून निर्मात्यांनी उत्सुकता अधिक ताणल्याची प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

पहा टीझर-

‘रामायण’च्या 2 मिनिट 38 सेकंदांच्या या टीझरमध्ये 2 मिनिट 11 व्या सेकंदापासून यशची एण्ट्री होते. यावेळी त्याचा पोशाख, मुकूट आणि चालण्याचा रुबाब त्या भूमिकेला साजेसा आहे. यश फक्त या चित्रपटात रावणाची भूमिकाच साकारत नाहीये, तर तो या चित्रपटाचा सहनिर्मातासुद्धा आहे. आधीच तो ‘केजीएफ’ या चित्रपटामुळे साऊथपासून संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरला आहे. आता त्याला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या दोन्ही चित्रपटांचं एकूण बजेट अंदाजे 4000 कोटी रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंतचा हा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे यांच्या भूमिका आहेत.

Follow Us