तुम देखो.. तुम्हारा बाप देख्या.. तुम्हारा पातशाह देख्या..; ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा.. शिवचरित्रातील थरारक अध्याय

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पुढील चित्रपट कधी जाहीर होणार, याची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते. अखेर दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांनी या संकल्पनेतील सहाव्या चित्रपटाची घोषणा केली. रणपति शिवराय- स्वारी आग्रा.. असं या चित्रपटाचं नाव आहे.

तुम देखो.. तुम्हारा बाप देख्या.. तुम्हारा पातशाह देख्या..; ‘रणपति शिवराय’- स्वारी आग्रा.. शिवचरित्रातील थरारक अध्याय
Ranapati Shivray Swari Agra
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 02, 2025 | 1:42 PM

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवण्याच्या उद्देशाने लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘श्री शिवराज अष्टक’ ही संकल्पना आणली. महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यातील ज्वलंत अध्याय शिवराज अष्टक संकल्पनेअंतर्गत रुपेरी पडद्यावर सादर झाले. यातील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज, सुभेदार’ ही पाच चित्रपुष्प प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या पाचही चित्रपटांना प्रेक्षकांचं उदंड प्रेम आणि आशीर्वाद लाभले. या संकल्पनेतील सहावं चित्रपटरुपी पुष्प नवीन वर्षात 19 फेब्रुवारी 2026 रोजी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं नाव आहे ‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियाद्वारे या भव्य चित्रपटाची घोषणा केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोठमोठ्या शत्रूंना आपल्या गनिमीकाव्याच्या जोरावर धूळ चारली. बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमी कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. पॅनोरमा स्टुडिओज आणि मुगाफी निर्मित ‘रणपति शिवराय’ – स्वारी आग्रा या भव्य चित्रपटातून शिवचरित्रातील हा थरारक अध्याय दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आता प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी (पॅनोरमा स्टुडिओज) आणि विपुल अगरवाल, जेनील परमार (मुगाफी) चित्रपटाचे निर्माते आहेत आणि सहनिर्माते रवींद्र औटी (पॅनोरमा स्टुडिओज), तन्शा बत्रा (मुगाफी) आहेत.

तुम देखो.. तुम्हारा बाप देख्या.. तुम्हारा पातशाह देख्या.. छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना घुमणार. जगभरातील शिवभक्तांच्या आग्रहाचा सन्मान करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र भवानीच्या चरणी अर्पण करीत आहोत, असं लिहित त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

असामान्य दूरदृष्टी, असीम धैर्य, प्रबळ इच्छाशक्ती आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या बळावर सार्वभौम स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कालातीत आहे. आपल्या भावी पिढयांना या चित्रपटांतून आत्मविश्वास व प्रेरणा मिळावी या उद्देशाने ‘शिवराज अष्टका’ची निर्मिती करण्यात आली आहे. ‘शिवराज अष्टका’तील चित्रपटही आपल्या भावी पिढयांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.