
कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारणाऱ्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या पाचही परीक्षकांवर एफआयआर दाखल झाली आहे तर दुसरीकडे आता हा मुद्दा संसदेतही पोहोचला आहे. समय रैनाच्या कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयटी प्रकरणांतील संसदीय समिती आता रणवीरला नोटीस पाठवण्याचा विचार करत आहे. ही समिती रणवीरला नोटीस बजावू शकते. एक दिवस आधीच या समितीच्या सदस्य प्रियंका चतुर्वेदी यांनी याची मागणी केली होती. त्यानंतर इतरही काही खासदारांनी यासंदर्भातील मागणी केल्याचं कळतंय.
रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह प्रश्नावर बीजेडी खासदार सस्मित पात्रा यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. “हे अत्यंत वाईट आहे. संसदीय स्थायी समितीचा सदस्य म्हणून मी हा मुद्दा समितीसमोर उपस्थित करणार आहे. आम्ही लवकरच बैठक घेणार आहोत. अशा पद्धतीच्या अपमानकारक टिप्पण्यांसाठी कठोर उपाययोजना असायला हव्यातत अशी माझी इच्छा आहे. विशेषत: संवेदनशील तरुण वर्ग अशा युट्यूबर्सचं लगेचच अनुकरण करतात. त्यामुळे या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी”, असं ते म्हणाले.
दरम्यान ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने (AICWA) ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा तीव्र निषेध केला आहे. त्याचप्रमाणे या शोवर तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. “रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये घृणास्पद आणि अपमानकारक वक्तव्ये केली आहेत. आपल्या समाजाच्या नैतिक रचनेला हा गंभीर धोका निर्माण करतो. अशा शोचं कधीच समर्थन करता येणार नाही. या शोशी संबंधित लोकांना भारतीय चित्रपट उद्योगाकडून कोणताही पाठिंबा मिळणार नाही”, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये समय रैना, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया हे परीक्षक होते. या या सर्वांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये त्यांच्यावर अश्लील आणि लैंगिक कंटेंटला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वादग्रस्त एपिसोड युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफीसुद्धा मागितली आहे.