आईवडिलांबद्दल अत्यंत अश्लील प्रश्न विचारणाऱ्या रणवीरला माफ करण्याची अभिनेत्रीची मागणी
'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या आक्षेपार्ह प्रश्नानंतर त्याच्यावर कारवाईची मागणी होत आहे. अशातच एका अभिनेत्रीने त्याची बाजू घेतली आहे. तो चुकलाय पण त्याला माफ करा, अशी विनंती या अभिनेत्रीने केली आहे.

‘इंडियाज गॉट टॅलेंड’ या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला आईवडिलांबद्दल अत्यंत अश्लील प्रश्न विचारला. त्यावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘बीयर बायसेप्स’ या नावाने सोशल मीडियावर पेज असलेल्या रणवीरवर सर्वच स्तरांतून जोरदार टीका होत आहे. या शोचा कर्ताधर्ता समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया या दोघांविरुद्ध तक्रारी आणि एफआयआर दाखल झाले आहेत. रणवीरने विचारलेले प्रश्न अत्यंत अश्लील आणि खालच्या पातळीचे होते, अशी टीका अनेकांकडून होत असताना आता एका अभिनेत्रीने त्याची बाजू घेतली आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून राखी सावंत आहे.
राखी सावंतने रणवीरला माफ करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये तिने लिहिलंय, “जरी रणवीर चुकला असला तरी त्याला माफ केलं पाहिजे. ठीक आहे, कधी कधी अशा चुका होतात. त्याला माफ करा. मला माहीत आहे की तो चुकलाय, तरी त्याला माफ करा.” विशेष म्हणजे समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या मागच्या एपिसोडमध्ये राखी सावंतने हजेरी लावली होती.




View this post on Instagram
दरम्यान समय रैना, आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया या सर्वांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये त्यांच्यावर अश्लील आणि लैंगिक कंटेंटला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे वादग्रस्त एपिसोड युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. वाद वाढल्यानंतर रणवीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत जाहीर माफीसुद्धा मागितली आहे. “विनोद हे माझं वैशिष्ट्य नाही. मी इथे फक्त माफी मागण्यासाठी आलोय. मी त्यासाठी कोणतंही कारण देणार नाही. मी फक्त माफी मागतोय”, असं त्याने व्हिडीओत म्हटलंय.
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमधील वादग्रस्त एपिसोड युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. एनएचआरसीने युट्यूबला व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश दिले होते. त्याचप्रमाणे गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया यांच्याशी संपर्क साधला आहे. पोलिसांनी दोघांनाही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास, सहकार्य करण्यास आणि या प्रकरणात त्यांची बाजू मांडण्यास सांगितलं आहे.