गायिकेची विचित्र कृती, देवी कालीसारखा मेकअप अन् हातात क्रॉस; खवळले नेटकरी

भारतीय वंशाची कॅनेडियन रॅपर टॉमी जेनेसिस तिच्या एका नव्या व्हिडीओमुळे वादात सापडली आहे. या गाण्यात तिने धार्मिक प्रतीकांचा वापर केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचसोबत 'ट्रू ब्ल्यू' हा तिचा म्युझिक व्हिडीओ लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली आहे.

गायिकेची विचित्र कृती, देवी कालीसारखा मेकअप अन् हातात क्रॉस; खवळले नेटकरी
रॅपर टॉमी जेनेसिस
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 23, 2025 | 9:52 AM

भारतीय वंशाची कॅनेडियन रॅपर टॉमी जेनेसिस ऊर्फ जेनेसिस यास्मिन मोहनराज तिच्या एका नव्या म्युझिक व्हिडिओमुळे वादात सापडली आहे. ‘ट्रू ब्ल्यू’ हा तिचा नवीन म्युझिक अल्बम नुकताच प्रदर्शित झाला असून त्यावरून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. या गाण्यात तिने धार्मिक प्रतीकांचा वापर केल्याबद्दल नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचसोबत तिचं हे गाण लवकरात लवकर हटवण्याची मागणी केली जात आहे. टॉमी जेनेसिसच्या ‘ट्रू ब्ल्यू’ या म्युझिक अल्बमला आतापर्यंत 82 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्स तिच्यावर संताप व्यक्त करत आहेत.

या म्युझिक अल्बममध्ये टॉमी जेनेसिस देवी कालीच्या रुपात दिसत असून तिने संपूर्ण शरीरावर निळा रंग लावला आहे. त्यावर सोन्याचे दागिने आणि गडद लाल रंगाची टिकली लावली आहे. देवी कालीच्या रुपातील टॉमीने हातात मात्र क्रॉस धरला आहे. या क्रॉसचा वापर तिने एक प्रॉप म्हणून केला आहे. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी व्हिडीओमध्ये ती क्रॉसला चाटताना दिसतेय. यासोबतच ती शरीरावर विविध ठिकाणी ठेवून विचित्र पद्धतीने पोझ देताना दिसतेय. जेनेसिसच्या या व्हिडीओने केवळ हिंदू धर्मातील लोकांनाच नाही तर ख्रिश्चन धर्मातील लोकांनाही अस्वस्थ केलं आहे.

या व्हिडीओवर अनेकांनी टॉमी जेनेसिसवर टीका केली आहे. लोकांचं लक्ष वेधण्यासाठी तिने देवाचा अपमान केला, असा आरोप काहींनी केला आहे. तर प्रसिद्धीसाठी इतक्या खालच्या पातळीला जाऊ नये, असंही संतप्त नेटकऱ्यांनी म्हटलंय. काहींनी या व्हिडीओविरोधात तक्रार करण्याचाही इशारा दिला आहे. अनेकांनी युट्यूबवर तिच्या व्हिडीओला रिपोर्ट करायला सुरुवात केली आहे. जेनेसिसने जाणूनबुजून संताप व्यक्त करण्याच्या उद्देशाने असा म्युझिक व्हिडीओ शूट केल्याचंही काहींनी म्हटलंय.

कोण आहे टॉमी जेनेसिस?

टॉमी जेनेसिसचं खरं नाव जेनेसिस यास्मिन मोहनराज असं आहे. तिचा जन्म कॅनडातील व्हॅनकुव्हर इथं झाला आहे. ती तमिळ आणि स्वीडिश पार्श्वभूमीची आहे. जेनेसिस तिच्या बोल्ड शैलीतील गाण्यांसाठी ओळखली जाते. याआधीही तिने असे म्युझिक व्हिडीओ रिलीज केले आहेत. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.