
झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून अभिनेता राकेश बापटने प्रचंड लोकप्रियता मिळवली. राकेश त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. त्याने टीव्ही अभिनेत्री रिधी डोगराशी लग्न केलं होतं. परंतु या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2019 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करणाऱ्या रिधीने बॉलिवूडमध्येही काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.
प्रेमात तू सर्वांत विचित्र गोष्ट कोणती केलीस, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हणाली, “माझ्या स्वाभिमानाची पर्वा न करता मी खूप प्रेम केलं. मला असं वाटतं की मी प्रेमात जो वेडेपणा केलाय, तो कोणीही करू नये. कारण त्यामुळे तुमच्या पदरी फक्त निराशाच येईल. याला प्रेम म्हणता येणार नाही. तुम्ही प्रेमात कृपया तुमचा स्वाभिमान नष्ट करू नका. कारण जोपर्यंत तुम्हाला तुमची किंमत कळेल, तोपर्यंत खूप उशीर झाला असेल.”
या मुलाखतीत रिधीने एका भेटवस्तूचाही उल्लेख केला, जो तिला तिचा पूर्व पती राकेश बापटने दिला होता. “मला आजपर्यंतची सर्वांत सुंदर भेटवस्तू माझ्या पूर्व पतीने दिली होती. ही भेटवस्तू स्वत: त्याने बनवली होती. पण दुर्दैवाने ती आता माझ्याकडे नाही. राकेशने माझं एक चित्र काढलं होतं”, असं तिने सांगितलं. त्याचसोबत ‘रेड फ्लॅग’सारख्या संकल्पनेवर विश्वास नसल्याचं तिने स्पष्ट केलं. “नात्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते की, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते, तिला तुमच्याबद्दल छोट्यातली छोटी गोष्ट माहीत असायला हवी. तुम्हाला कधी कोणती गोष्ट आवडते आणि कोणती नाही, हे त्यांना समजलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले आहे आणि आता नव्या रिलेशनशिपसाठीही मी तयार आहे”, असं रिधीने स्पष्ट केलं.
घटस्फोटानंतर राकेश आणि रिधी यांच्यात चांगली मैत्री आहे. “राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं.