धर्मेंद्र यांचा दोन्ही पत्नींसोबतचा एकमेव दुर्मिळ फोटो; आजवर एकदाच दिसल्या सोबत

अभिनेते धर्मेंद्र हे बॉलिवूडमधील त्या सेलिब्रिटींपैकी एक आहेत, ज्यांनी दोन लग्न केले आहेत. परंतु दुसरं लग्न करण्यासाठी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. आता सोशल मीडियावर त्यांचा एक दुर्मिळ फोटो समोर आला आहे. प्रकाश कौर आणि हेमा मालिनी या दोन्ही पत्नींसोबतचा त्यांचा हा कदाचित एकमेव फोटो असावा, असं म्हटलं जात आहे.

धर्मेंद्र यांचा दोन्ही पत्नींसोबतचा एकमेव दुर्मिळ फोटो; आजवर एकदाच दिसल्या सोबत
धर्मेंद्र, प्रकाश कौर आणि हेमा मालिनी
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2025 | 11:49 AM

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते धर्मेंद्र यांनी 1954 मध्ये वयाच्या 19 व्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं. पत्नी आणि चार मुलं असतानाही ते दुसऱ्यांदा प्रेमात पडले. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या प्रेमात ते आकंठ बुडाले होते. 1980 मध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्याशी दुसरं लग्न केलं. परंतु त्यासाठी त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी धर्म बदलून एकमेकांशी लग्न केलं. “मी तिच्या जागी असते तर असं कधीच केलं नसतं”, अशी रोखठोक प्रतिक्रिया धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांनी एका मुलाखतीत दिली होती. तर हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की त्या लग्नानंतर कधीच प्रकाश कौर यांना भेटल्या नव्हत्या किंवा धर्मेंद्र आणि त्यांच्या जुहू इथल्या बंगल्यात प्रवेश केला नव्हता.

प्रकाश कौर यांच्याशी झालेल्या भेटीबद्दल हेमा मालिनी यांनी सांगितलं होतं की, लग्नानंतर मी पुन्हा कधीही त्यांना भेटले नाही. इतकंच नव्हे तर धर्मेंद्र यांच्या जुहू इथल्या बंगल्यात कधीच पाऊल ठेवलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. तिथून थोड्या अंतरावर असलेल्या बंगल्यात हेमा मालिनी त्यांच्या मुलींसोबत राहायच्या. परंतु एकदा असा प्रसंग आला होता जेव्हा धर्मेंद्र यांच्या दोन्ही पत्नी प्रकाश कौर आणि हेमा मालिनी एकत्र दिसल्या होत्या. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉलिवूडमधील अत्यंत दुर्मिळ फोटोंपैकी हा एक मानला जातो. या फोटोमध्ये धर्मेंद्र त्यांच्या दोन्ही पत्नींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत.

स्टारडस्ट मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश कौर याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “मला माहीत नाही की यासाठी मी धर्मेंद्र यांना दोष द्यावा की नशिबाला, पण एक गोष्ट निश्चित आहे की, ते माझ्यापासून कितीही दूर असले तरी, काहीही झालं तरी, मला जेव्हा त्यांची गरज असेल तेव्हा ते नक्कीच माझ्यासाठी धावून येतील. त्यांच्यावरील मी माझा विश्वास गमावलेला नाही. शेवटी ते माझ्या मुलांचे पिता आहेत. धर्मेंद्र हे माझ्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. आजही मी त्यांच्यावर खूप प्रेम करते आणि त्यांचा आदर करते”, असं त्या म्हणाल्या होत्या.