लग्नाच्या 4 वर्षांनी घटस्फोट, दुसऱ्याकडून विश्वासघात..; 8 वर्षांपासून प्रसिद्ध अभिनेत्री नैराश्यात
एका प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. आठ वर्षे नैराश्याचा सामना केल्याचं तिने सांगितलं आहे. ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री असून लग्नाच्या चार वर्षांनंतर तिचा घटस्फोट झाला होता.

रश्मी देसाई ही टेलिव्हिडन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक हिट मालिकांमध्ये काम करून ती घराघरात लोकप्रिय झाली. रश्मी तिच्या मालिकांसोबत खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. रश्मीचं लग्न, घटस्फोट यांबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या आयुष्यातील सर्वांत आव्हानात्मक टप्प्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. जवळपास आठ वर्षांपर्यंत नैराश्याचा सामना केल्याचा खुलासा तिने यावेळी केला. ‘उतरन’ आणि ‘दिल से दिल तक’ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकलेली रश्मी खऱ्या आयुष्यात इतक्या कठीण काळाचा सामना करत असेल, याची कल्पनासुद्धा तिच्या चाहत्यांनी केली नसेल. भावनिक ताणामुळे मानसिक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम झाल्याचं तिने सांगितलं.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मी म्हणाली, “एक वेळ अशी होती, जेव्हा मी आठ वर्षे नैराश्याचा सामना करत होती. त्यातून बाहेर पडायला मला वेळ लागला. कारण माझ्यावर प्रचंड भावनिक ताण होता. सर्वकाही सुरळीत करण्यासाठी आणि पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी मला काही वर्षांचा काळ लागला. आता पुन्हा एकदा मी हळूहळू रुळावर येत आहे. मला असं वाटतं की याबाबतचे निर्णय तुम्हाला स्वत:लाच घ्यावे लागतात. तुमचा प्रवास दुसरा कोणीच ठरवू शकत नाही. मला कामातून मानसिक शांती मिळते. मी काम करत राहिल्यामुळे यातून बाहेर पडू शकते, हे मला फार उशिरा समजलं होतं. आता मी काम आणि खासगी आयुष्य यांच्यातील संतुलन राखण्यात यशस्वी ठरतेय.”
View this post on Instagram
रश्मीने पुढे हेसुद्धा मान्य केलं की, तिला खूप उशिरा या गोष्टीची जाणीव झाली की काम ही तिची सुरक्षित जागा बनली आहे, जिथे ती तिच्या भावना व्यक्त करू शकते आणि वैयक्तिक समस्यांमध्येही स्थिरता मिळवू शकते. आता कामासोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचं तिने स्पष्ट केलं. रश्मीने मालिकांसोबतच ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 6’, ‘नच बलिए 7’ आणि ‘झलक दिखला जा7’ यांसारख्या शोजमध्येही काम केलंय.
याआधी ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत रश्मीने इंडस्ट्रीमध्ये तिच्या सुरुवातीच्या काळात घडलेल्या एका अत्यंत अस्वस्थ करणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा सामना केल्याचा खुलासा तिने केला होता. “मला एका ऑडिशनसाठी बोलावलं होतं. मी तिथे गेले तेव्हा मला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी कसंबसं तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाली आणि काही तासांनंतर मी माझ्या आईला याबद्दल सर्वकाही सांगितलं”, अशी धक्कादायक घटना रश्मीने सांगितली होती.
