माझ्यामुळेच TRP वाढतोय असा माज..; ‘रात्रीस खेळ चाले’च्या ‘शेवंता’ने अपूर्वा नेमळेकरला सुनावलं
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री कृतिका तुळस्करने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत अपूर्वा नेमळेकरला उत्तर दिलं आहे. अपूर्वाने कृतिकाला 'अनप्रोफेशनल अभिनेत्री' असं म्हटलं होतं.

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर घराघरात पोहोचली. मात्र काही वादानंतर तिने ही मालिका अचानक सोडली होती. नंतर अपूर्वाच्या जागी अभिनेत्री कृतिका तुळस्करला शेवंताच्या भूमिकेसाठी निवडण्यात आलं. आता नुकत्याच दिलेल्या एका पॉडकास्ट मुलाखतीत अपूर्वाने कृतिकावर ‘अनप्रोफेशनल’ असल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर उत्तर देण्यासाठी कृतिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘मी नेहमी माझ्या कामाला बोलू दिलं आहे. ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्यांनाच माझ्या प्रोफेशनलिझ्मबद्दल बोलण्याचा खरा अधिकार आहे. बाकी प्रत्येक मत हे फक्त एक मत असतं,’ असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
काय म्हणाली कृतिका?
“‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार मी कृतिका तुळस्कर. आताच थोड्या वेळापूर्वी मी एक व्हिडीओ बघितला, त्याच्यामध्ये माझ्याआधी ज्या अभिनेत्रीने शेवंता ही भूमिका साकारली होती, तिचं असं म्हणणं आहे की मी अनप्रोफेशनल अभिनेत्री आहे. तर तिला मी हे सांगू इच्छिते की अनप्रोफेशनल आणि प्रोफेशनल यात काय फरक असतो? अनप्रोफेशनलिझ्म याला म्हणतात की सेटवर वेळेवर न येणं, दिग्दर्शकाला वाट बघावी लागणं, इतर कलाकारांशी नीट न वागणं, निर्मात्याशी नीट न वागणं आणि माझ्याचमुळे या सीरिअलचा टीआरपी वाढतोय, असा माज सगळ्या कलाकारांना दाखवणं, याला अनप्रोफेशनलिझ्म म्हणतात,” अशा शब्दांत तिने अपूर्वाला उत्तर दिलं.
कृतिकाचा व्हिडीओ-
या व्हिडीओमध्ये ती पुढे म्हणाली, “अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो, तेव्हा त्या मालिकेचा, कलाकारांचा, तंत्रज्ञांचा विचार न करता.. आपण ही मालिका सोडली तर या सर्वांच्या पोटापाण्याचं काय होईल.. याचा विचार न करता जसं ती सर्वांना सांगते की मी ही मालिका सोडली, तसं सोडून जाणं याला अनप्रोफेशनलिझ्म म्हणतात. एका रात्रीत या मालिकेसाठी उभं राहणं, कुठलीही मालिकेची पार्श्वभूमी नसताना त्या मालिकेला न्याय देणं, याला प्रोफेशनलिझ्म म्हणतात.”
कृतिकाकडून मला एक फोन अपेक्षित होता, असं अपूर्वाने बोलून दाखवलं होतं. त्यावरही तिने उत्तर दिलं आहे. “तिने असं सांगितलं की मी तिला फोन करायला हवा होता. का? तुझी-माझी ओळख आहे? आपण खूप जन्मजन्मांपासूनच्या मैत्रिणी आहोत? नाही. एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे एखादी संधी चालून आली, तर त्याचं सोनं कसं करायचं, याचा विचार मी करणार की मी फोन करून काय गं बाई, काय झालं, तू का सोडून गेली की तुला काढलं गेलं, याविषयी मी तुला विचारणार? तर मला वाटतं की मी माझं काम शंभर टक्के केलंय आणि मी तिला विचारण्यासाठी बांधिल नाही. माझ्या प्रोफेशनबद्दल आणि मला अनप्रोफेशनल बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. कारण आम्ही कधी एकत्र कामच केलं नाही. त्यामुळे मी सेटवर कशी वागते, हे तिला माहीत नाही. यापुढे माझ्याबाबत कुठेही आणि कुठल्याही माध्यमात बोलताना थोडासा विचार करावा, तर याला आपण प्रोफेशनलिझ्म म्हणू.” कृतिकाच्या या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.