Harishchandragad Mishap : हरिश्चंद्र गड उतरताना घडली मोठी दुर्घटना, ट्रेकिंगला गेलेले मालाडचे चार जण हॉस्पिटलमध्ये
Harishchandragad Mishap : महाराष्ट्रात पावसाळ्या ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करण्याची मजा, आनंद काही वेगळाच असतो. पण काही वेळा पावसाळी सहलींमध्ये दुर्घटना सुद्धा घडतात.

सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे आपसूकच लोकांची पावलं डोंगर, घाटमाथे, धबधबे, नदी, गड-किल्ल्यांकडे वळत आहेत. पावसाळ्यात निसर्गाने हिरवा शालू पांघरलेला असतो. निसर्गाचं सर्वात सुंदर रुप पावसाळ्यात दिसतं. पर्यटक मोठ्या संख्येने वर्षा सहलीसाठी निघतात. महाराष्ट्रात पावसाळ्या ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. गड-किल्ल्यांवर भ्रमंती करण्याची मजा, आनंद काही वेगळाच असतो. पण काही वेळा पावसाळी सहलींमध्ये दुर्घटना सुद्धा घडतात.अशीच एक दुर्घटना हरिश्चंद्र गड परिसरात घडली. हरिश्चंद्र गडावर दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. भंडारदरा परिसरात रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होती.
गड उतरत असताना पाऊस सुरू असल्याने अचानक माती-दगड कोसळले. रेलिंगमुळे मोठा अनर्थ टळला. ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांनी तत्काळ मदत केली. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून पायथ्याशी आणले. राजूर येथे प्राथमिक उपचार करून नाशिकला हलवले. जखमी पर्यटक मुंबई मालाड येथील आहेत. वन्यजीव विभागाला घटनेची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मालाड परिसरातील दहा पर्यटक हरिश्चंद्र गडावर भटकंती करण्यासाठी आले होते. ते परतीच्या मार्गावर होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
तिघांची प्रकृती चिंताजनक
रिमझिम पाऊस पडत होता. तितक्यात आडव्या कड्याच्या मागील बाजूस अचानक माती आणि दगडांचा भाग कोसळला. पर्यटकांच्या अंगावर ही दगड माती पडली. त्यात दोन जण दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिकांच्या मदतीने माती व दगडाखाली अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर जखमींना उपचारासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रामप्रकाश यादव, निलेश गोमती विश्वकर्मा, कृष्णा कुमार साहू आणि दिनेश संजय साहू अशी जखमी पर्यटकांची नावे आहेत. तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतय.
108 रुग्णवाहिकेने जखमींना नाशिकच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. राजूर येथील डॉक्टर अभिनव लहामटे यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यांना अधिक चांगल्या उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.पावसाळ्यात हरिश्चंद्र गडावर दरड कोसळण्याच्या घटना वाढू शकतात.
