
Love Life: ‘रात्रीस खेळ चाले 2’ मालिकेत महत्त्वाची भूमिका बजावत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Actress Apurva Nemlekar) हिने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. शेवंता म्हणून चाहत्यांच्या भेटीस आलेली अपूर्वा हिने नुकताच झालेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. अपूर्वा हिच्या घटस्फोटाला 10 वर्ष झाली आहेत. घटस्फोटानंतर आयुष्यात आलेले चढ-उतार अपूर्वाने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शिवाय अभिनेत्री दुसऱ्या लग्नाबद्दल देखील मोठा खुलासा केला आहे.
लग्नाबद्दल अपूर्वा म्हणाली, ‘खरं सांगायचं झालं तर, मी लग्न केलं होतं. आता माझ्या घटस्फोटाला 10 वर्ष झाली आहे. आता त्या आठवणींमधून मी बाहेर पडली आहे. काही गोष्टी स्वीकारायला वेळ लागला. विश्वासघात पचवायला मला वेळ लागला. पण आता मी एकटी राहायला शिकली आहे. ‘
‘अनेकांना वाटत नाही की, त्यांना वाटतं मी असचं काही तरी सांगत आहे. पण असं काही नाही. मी सिंगल आहे. काही वर्ष रडण्यात गेले तर काही वर्ष स्वतःला सावरण्यात गेली. पण आता सिंगलच बरं आहे… असं वाटतं. लग्नसंस्थेवर माझा विश्वास आहे. जर लग्न योग्य व्यक्तीसोबत झालं असेल तर..’
पुढे अपूर्वा म्हणाली, ‘लग्न करायचं की नाही… हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का. त्यापेक्षा महत्त्वाचं तुम्हा समोरच्याला सर्व काही देऊ शकता का? ज्या दिवशी याची जाणीव होईल, जेव्हा तुम्ही सर्वकाही स्वीकारण्यासाठी तयार होणार.. तेव्हाच तुम्ही लग्न केलं पाहिजे.’
‘समाजाचा दबाव आहे म्हणून कधीच लग्न करू नका. आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतो का? हे जाणून घेतल्यानंतरच लग्न करा. नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे आणि मला पुन्हा एकदा ते सगळं अनुभवायचं होतं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
अपूर्वा हिचं पहिलं लग्न 2014 मध्ये रोहन देशपांडे यांच्यासोबत झालं होतं. पण अभिनेत्रीचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर अभिनेत्रीने घटस्फोटाचा निर्णय घेतला. आता अभिनेत्री दुसऱ्या लग्नासाठी तयार आहे.. असं देखील म्हणाली होती.