
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी 18 सप्टेंबर रोजी आपला 75 वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त बी-टाऊनमधील बरेच सेलिब्रिटी पार्टीला उपस्थित होते. उर्मिला मातोंडकरपासून माधुरी दीक्षित, रेखा, विद्या बालन, करण जोहर, मनिष मल्होत्रा, सोनू निगमपर्यंत अनेक लोकप्रिय चेहरे एकाच छताखाली आले. या बर्थडे पार्टीत उर्मिला, विद्या, माधुरी, रेखा यांनी एकत्र डान्स करत चार चाँद लावले. ‘कैसी पहेली है ये’ या गाण्यावर त्यांनी ठेका धरला आणि त्यांना मनमुराद नाचताना पाहून उपस्थित पाहुणेही थिरकायला लागले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
अभिनेते संजय कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय सुंदर संध्याकाळ होती. बॉलिवूडच्या ओरिजिनल क्वीन्स. रेखा, माधुरी, उर्मिला आणि विद्या’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये रेखा, उर्मिला, माधुरी आणि विद्या एकमेकींसोबत नाचताना दिसत आहेत. त्यानंतर शबाना आझमीसुद्धा त्यांच्यात सहभागी होतात आणि नाचू लागतात. रेखा त्यांना डान्स स्टेप्स सांगतात आणि सर्व जणी आपापल्या अंदाजाच मनसोक्त नाचतात. शबाना यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थितांना हे दुर्मिळ दृश्य पहायला मिळालं.
या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर्व दिग्गज अभिनेत्री एकाच फ्रेममध्ये’ असं एकाने लिहिलंय. तर ‘काहीच बदललं नाही. सर्व जणी खूप छान आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘अशी फ्रेम पहायला मिळणं ही चाहत्यांसाठी पर्वणी आहे’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्याही डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘लिटिल लिटिल बेबी’ या गाण्यावर दोघं एकमेकांसोबत कपल डान्स करताना दिसत आहेत. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘तर तुम्ही अशा प्रकारे पंच्याहत्तरीत प्रवेश करता. शबाना आझमी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जावेद अख्तर आणि तुम्ही अशाच प्रकारे चिरतरुण राहा’, अशा शब्दांत फराहने शुभेच्छा दिल्या आहेत.