तुमची मुलगी असती तर..; चाहत्यांवर का भडकली रिंकू राजगुरू?

शासनातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जळगाव महासांस्कृतिक कार्यक्रमात अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली होती. मात्र या कार्यक्रमातून बाहेर पडताना ती एका चाहत्यावर चांगलीच भडकली होती. याठिकाणी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का, असा सवाल तिने चाहत्याला केला.

तुमची मुलगी असती तर..; चाहत्यांवर का भडकली रिंकू राजगुरू?
Rinku Rajguru
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 04, 2024 | 8:27 AM

जळगाव : 4 मार्च 2024 | नुकतंच जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाला विशेष पाहुणी म्हणून ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरूने हजेरी लावली होती. रिंकूची एक झलक पाहण्यासाठी जळगावकर उत्सुक झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर रिंकू जेव्हा बाहेर जात होती, तेव्हा काही चाहत्यांनी धक्काबुक्की केली. गर्दीतून बाहेर पडताना रिंकूलाही एका चाहत्याचा धक्का लागला. त्यामुळे रिंकू चांगलीच भडकली होती. ‘या जागी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का’, असा प्रश्न रिंकूने त्या चाहत्याला केला. रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.

जळगावमधील या कार्यक्रमात रिंकूने ‘सैराट’मधील तिचा लोकप्रिय डायलॉगसुद्धा म्हणून दाखवला होता. विशेष म्हणजे हा डायलॉग तिने खान्देशी भाषेत म्हणून दाखवला. यावेळी चाहत्यांनी एकच कल्ला केला. कार्यक्रम संपल्यानंतर तिथून बाहेर पडताना काही चाहत्यांनी गर्दीत धक्काबुक्की केली. त्यामुळे रिंकूचा राग अनावर झाला. या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन शासनाकडून करण्यात आलं होतं. मात्र कार्यक्रम संपल्यानंतर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यास आयोजकांना काही प्रमाणात अपयश आल्याचं पहायला मिळालं.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचं आयुष्य पूर्णपणे पालटलं. अकलूजची रिंकू ‘सैराट’च्या शूटिंगच्या वेळी फक्त 15 वर्षांची होती. “रातोरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझ्या मनात भीती निर्माण झाली नाही. पण मला या यशाची किंचितही कल्पना नव्हती. या संधीसाठी मी आयुष्यभर आभारी आहे. मला हे यश सांभाळून ठेवायचं आहे आणि त्याबाबत जबाबदार व्हायचंय. या यशामुळे मी घाबरले नाही. माझ्या स्वभावात जराही बदल झालेला नाही. मी अजूनही तशीच आहे. कारण मी स्टारडमबद्दल विचार करत नाही”, अशा शब्दांत ती एका मुलाखतीत व्यक्त झाली होती.

‘सैराट’नंतर रिंकूने इतरही काही चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा 2’मधील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटात अभिनेत्री निर्मिती सावंतसोबत रिंकूची जोडी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस आली होती.