
Bollywood Actor : बॉलिवूडमध्ये 1950 ते 1990 या काळात अनेक दिग्गज कलाकारांनी आपला दबदबा निर्माण केला. दिलीप कुमार, राजेश खन्ना, राज कपूर, ऋषि कपूर, अमरीश पुरी, अमजद खान, अमिताभ बच्चन आणि शशि कपूर यांसारख्या सुपरस्टार्सनी या काळात हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. या सर्व कलाकारांमध्ये काही जण त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि स्वतःच्या अटींवर काम करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यापैकीच एक नाव म्हणजे ऋषि कपूर.
ऋषि कपूर हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि स्पष्ट मतांसाठी ओळखले जात. फारच कमी लोकांना माहिती आहे की त्यांनी आपल्या कामासाठी एक ठाम नियम केला होता. तो म्हणजे ते कधीही रात्री शूटिंग करत नसत. त्यांच्या मते, चित्रपटातील काम हे नोकरीसारखे आहे आणि त्याला ठराविक वेळ असावी. त्यामुळे ते सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेतच शूटिंग करत. या सवयीमुळे त्यांनी अनेक चित्रपटही नाकारले. परंतु तरीही त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. सेटवर ते अत्यंत शिस्तप्रिय होते आणि वेळेचे काटेकोर पालन करत.
डेविड धवन यांनी सांगितलेला किस्सा
अलीकडेच द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमात दिग्दर्शक डेविड धवन त्यांचा मुलगा वरुण धवन सोबत उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी ऋषि कपूर यांच्याबद्दल एक मजेशीर आणि लक्षवेधी किस्सा सांगितला. ते म्हणाले की, ऋषि कपूर यांच्यासोबत काम करताना त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. मात्र, ते प्रत्येक सीनबद्दल प्रश्न विचारायचे. हे का करायचं? आणि समाधानकारक उत्तर मिळाल्याशिवाय ते सीन करत नसत.
त्यांनी एक खास प्रसंग सांगितला. एक दिग्दर्शक ऋषि कपूर यांना कथा सांगण्यासाठी त्यांच्या गाडीत बसला. कथा सांगताना पहिल्याच सीनमध्ये रात्रीचा प्रसंग असल्याचे समजताच ऋषि कपूर यांनी गाडी थांबवायला सांगितली आणि स्पष्टपणे सांगितले, मी रात्रीचे शूट करत नाही आणि त्या दिग्दर्शकाला मध्येच उतरवले.
कारकीर्द आणि यश
कपूर कुटुंबात जन्मलेल्या ऋषि कपूर यांनी ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये रोमँटिक नायकाची भूमिका साकारली. त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमर अकबर अँथनी, लैला मजनू आणि नगीना यांचा समावेश आहे.