Riteish Deshmukh: खिशातून 100 रुपये देणाऱ्या मराठमोळ्या पापाराझीला रितेश देशमुखने शोधून काढलं; केली परतफेड

कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या व्यक्तींचं काम केवळ कलाकारांचे फोटो घेण्यापुरतं मर्यादित नसतं. प्रसंगी त्यांच्यातही माणुसकी, आपुलकी आणि मदतीची भावना असू शकते. त्यामुळे रितेशने सांगितलेला हा प्रसंग सध्या चर्चेत असून, त्याच्या चाहत्यांनाही हा अनुभव भावला आहे.

Riteish Deshmukh: खिशातून 100 रुपये देणाऱ्या मराठमोळ्या पापाराझीला रितेश देशमुखने शोधून काढलं; केली परतफेड
रितेश देशमुख, पापाराझी
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 10, 2026 | 1:49 PM

काही दिवसांपूर्वी अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रस्त्यावरील एका चिमुकल्याला मदत करण्याच्या प्रसंगात त्याच्याकडे रोख पैसे नव्हते. तेव्हा एका पापाराझीने स्वत:च्या खिशातून त्याला शंभर रुपये दिले. सेलिब्रिटी आणि पापाराझी यांच्यातील नात्याबाबत अनेकदा वेगवेगळ्या चर्चा होत असतात. कलाकारांना कॅमेऱ्यासमोर आणण्यासाठी पापाराझींना पैसे दिले जातात, अशीही चर्चा केली जाते. मात्र रितेशने याच विषयावर स्वतःचा अनुभव सांगताना हा मजेशीर आणि माणुसकी जपणारा किस्सा शेअर केला आहे.

रितेशने सांगितलेला हा प्रसंग मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेरचा आहे. याचवेळी काही लहान मुलं रितेशजवळ आली आणि त्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. रितेशला त्या मुलांना मदत करायची होती, मात्र त्यावेळी त्याच्याकडे रोख पैसे नव्हते. आजकाल सर्वत्र डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रितेशने त्या मुलाला विचारलं, “तुझ्याकडे GPay आहे का?” त्याने नकारार्थी उत्तर देताच “मग कसं देऊ?” असा सवाल रितेशने केला. मुलाला मदत करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका पापाराझी फोटोग्राफरने पुढाकार घेत रितेशला पैसे देऊन मदत केली.

या घटनेचा उल्लेख करताना रितेशने पापाराझीचं कौतुक केलं. त्याच्या मते, एखाद्या व्यक्तीची मदत करण्यासाठी पुढे येणं ही पैशांपेक्षा मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे तो पापाराझी रितेशच्या परिचयाचा नव्हता. तरीही त्याने कोणताही संकोच न करता मदतीचा हात पुढे केला. या छोट्याशा प्रसंगाने रितेशच्या मनावर चांगलीच छाप पाडली. सेलिब्रिटी पापाराझींना पैसे देतात, अशी सर्वसाधारण चर्चा असते; पण माझ्या बाबतीत मात्र उलट अनुभव आला, असं त्याने गंमतीने सांगितलं. “लोक म्हणतात की तुम्ही पापाराझींना पैसे देता, पण मला पापाराझींकडून पैसे मिळाले,” अशा आशयाची प्रतिक्रिया देत त्याने हा किस्सा सांगितला.

या घटनेनंतर रितेशने त्या पापाराझीला शोधण्याचाही प्रयत्न केला. त्याचं नाव सुशील मोहिते असल्याचं समोर आलं. रितेशने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करून त्याचा शोध घेतला आणि नंतर त्याचे पैसेही परत केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us