GPay आहे का? रस्त्यावर भीक मागणाऱ्या चिमुकल्याला रितेश देशमुखचा सवाल; पापाराझीने दिले पैसे, आता शोधतोय त्याचा नंबर
Riteish Deshmukh: अभिनेता रितेश देशमुख त्याच्या एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओनंतर आता रितेशने एका पापाराझीचा फोटो शेअर करत त्याचा मोबाइल नंबर शोधून देण्याची विनंती केली आहे.

अभिनेता रितेश देशमुख सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. एका चिमुकल्याला मदत करण्याच्या प्रसंगात रितेशकडे रोख पैसे नसल्याने एका पापाराझीने स्वत:च्या खिशातून पैसे दिले. आता त्याच पापाराझीचे पैसे परत करण्यासाठी रितेशने सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत त्याचा मोबाइल नंबर शोधण्यासाठी चाहत्यांची मदत मागितली आहे. रितेशच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसले. दोघंही तिथे एका पार्टीसाठी आले होते. रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना नेहमीप्रमाणे पापाराझी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शूट करत होते. याचवेळी काही लहान मुलं रितेशजवळ आली आणि त्यांनी त्याच्याकडे पैसे मागितले. रितेशला त्या मुलांना मदत करायची होती, मात्र त्यावेळी त्याच्याकडे रोख पैसे नव्हते. आजकाल सर्वत्र डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रितेशने त्या मुलाला विचारलं, “तुझ्याकडे GPay आहे का?” त्याने नकारार्थी उत्तर देताच “मग कसं देऊ?” असा सवाल रितेशने केला.
पहा व्हिडीओ-
When Riteish Deshmukh had no cash, Paps gave him the money for kids
Ritesh upload the photo on Insta story, he said Thanks to Paps pic.twitter.com/DSABqlkkmM
— Aniket (@aniket18x) August 23, 2026
रितेशची पोस्ट-

मुलाला मदत करण्यासाठी काहीतरी मार्ग शोधत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका पापाराझी फोटोग्राफरने पुढाकार घेतला. त्याने स्वत:च्या खिशातून 100 रुपये काढून मुलाला देण्यासाठी रितेशला दिले. रितेशने “नाही नाही, नको..” असं म्हणत पापाराझीला विनंती केली, मात्र तरीही फोटोग्राफरने मदत करण्याचा निर्णय घेतला. घटना तिथेच संपली नाही. रितेशला या पापाराझीचे पैसे परत करायचे होते. त्याने त्याचा GPay नंबर मागण्याचा प्रयत्न केला. मात्र आजूबाजूची गर्दी आणि घाईमुळे नंबर घेण्याऐवजी त्याने पापाराझीचा फोटो आपल्या मोबाइलमध्ये काढून ठेवला. आता रितेशने त्याच पापाराझीचा फोटो इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. ‘भाऊ, धन्यवाद. त्याने माझ्या वतीने मुलांना पैसे दिले आणि मला त्याची उधारी चुकवायची आहे. कृपया त्याचा मोबाइल नंबर शोधण्यासाठी मदत करा’, अशी विनंती त्याने नेटकऱ्यांना केली आहे.
रितेशने अवघ्या शंभर रुपयांचीही उधारी लक्षात ठेवून ती परत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं अनेकजण कौतुक करत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी रितेश आणि त्या पापाराझीने मुलाला मदत करण्यासाठी दाखवलेल्या संवेदनशीलतेचंही कौतुक केलं आहे.
