
अभिनेत्री जिनिलिया डिसूझा-देशमुखने बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलंय. नुकतीच ती आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात झळकली. मुंबईत या चित्रपटाच्या प्रीमिअरचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रीमिअरला जिनिलिया आणि तिचा पती रितेश देशमुख एकत्र आले होते. त्याठिकाणी मोठ्या संख्येने चाहते, फोटोग्राफर्स आणि पापाराझीसुद्धा उपस्थित होते. अशातच रितेशचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओमध्ये रितेश पत्नी जिनिलियाचा हात धरून प्रीमिअरला जाताना दिसत आहेत. या दोघांभोवती लोकांचा घोळका पहायला मिळतोय. गर्दीतून पत्नीला पुढे नेत असतानाच रितेशसमोर एक तरुण मुलगा सेल्फीसाठी येतो. परंतु रितेश त्याला जी वागणूक देतो, ते पाहून नेटकरी त्याच्यावर चिडले आहेत.
पापाराझींनी शूट केलेला रितेशचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये रितेश जिनिलियाचा हात पकडून गर्दीतून पुढे चालताना दिसतोय. त्यावेळी त्याच्यासमोर एक मुलगा फोन घेऊन सेल्फी क्लिक करण्यासाठी येतो. परंतु रितेश त्याचा हात झटकून बाजूला करतो आणि त्याच्याकडे न पाहताच पुढे निघून जातो. चाहत्यासोबतचं त्याचं हे वागणं अनेकांना पटलं नसून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
‘पहिल्यांदा मला रितेशचं वागणं आवडलं नाही’, असं एकाने लिहिलंय. तर ‘रितेशकडून अशा वागणुकीची अपेक्षा नव्हती. माफ करा पण तुम्हाला अनफॉलो करतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘विचार करा, त्या मुलाच्या आईवडिलांनी त्याला तुझ्याकडे फक्त एका फोटोसाठी पाठवलं असेल आणि तोसुद्धा नम्रपणे तुझ्यासमोर आला होता. यात एवढं चुकीचं काय होतं’, असा सवाल नेटकऱ्यांनी रितेशला केला. हेच तुझे खरे रंग आहेत का, अशा संतप्त प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.
रितेश आणि जिनिलिया नेहमी फोटोग्राफर्स, पापाराझी आणि चाहत्यांसमोर नम्रपणे वागताना दिसतात. इतकंच नव्हे तर त्यांची मुलंसुद्धा पापाराझींना बघून हात जोडून नमस्कार करतात. मग अचानक रितेशच्या वागणुकीत हा बदल कसा झाला, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रितेशचा नुकताच ‘हाऊसफुल 5’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तर जिनिलियाने ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खानसोबत स्क्रीन शेअर केला आहे.