“या बाईला हवंय तरी काय?”; कॅन्सरग्रस्त हिना खानवर अभिनेत्रीची टीका
अभिनेत्री हिना खान कॅन्सरचा वापर पब्लिसिटीसाठी करत असल्याचा आरोप प्रसिद्ध अभिनेत्रीने केला आहे. या बाईला हवंय तरी काय असा सवाल तिने केला आहे. तसंच हिना तिच्या उपचारांविषयी खोटं बोलत असल्याचाही दावा या अभिनेत्रीने केला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. तिच्यावर तिसऱ्या स्टेजच्या ब्रेस्ट कॅन्सरचे उपचार सुरू आहेत. या उपचाराविषयी आणि प्रकृतीविषयी हिना सतत सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना माहिती देतेय. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या नखांचा फोटो पोस्ट केला होता. किमोथेरपीमुळे नखांचा रंग उडाल्याचं तिने सांगितलं. मात्र हिना हे सर्व फक्त लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी करत असल्याची टीका एका अभिनेत्रीने केली आहे. हिना तिच्या कॅन्सरच्या स्टेजबद्दलही खोटं बोलल्याचा दावा या अभिनेत्रीने केला होता.
‘माझ्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांसोबतच इतर बरेच जण मला माझ्या नखांविषयी प्रश्न विचारत आहेत. मी माझ्या नखांवर नेलपॉलिश लावलेली नाही. नेलपेंट लावून मी प्रार्थना कशी करू शकते? माझ्या प्रिय साथीदारांनो, थोडं तरी डोकं लावा. नखांचा रंग उडणं हा किमोथेरपीचा सर्वसामान्य साइड इफेक्ट आहे. माझी नखं कमकुवत आणि ड्राय झाली आहेत. कधी कधी पूर्ण नखंच निघून येतात,’ असं हिनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. तिच्या याच पोस्टवरून अभिनेत्री रोझलिन खानने निशाणा साधला आहे. हिना पब्लिसिटीसाठी तिच्या आजारपणाचा वापर करतेय, अशी टिका तिने केली.

‘एखाद्याच्या नखाच्या रंगाबद्दल बोलल्यामुळे मी असंवेदनशील ठरते का? डार्लिंग कॅन्सरच्या प्रत्येक रुग्णासाठी हे सर्वसामान्य आहे. हे प्राणघातक नाही. इथे तर आतड्यांमधून रक्तस्राव झाला, सांध्यांमधून रक्तस्राव झाला. तरी मी कधीच पब्लिसिटीसाठी रडले नाही. या बाईला अखेर हवंय तरी काय?’, असा खोचक सवाल रोझलिनने केला. रोझलिनलाही कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र उपचारानंतर तिने कॅन्सरवर मात केली. हिना तिच्या कॅन्सरबद्दल लोकांना चुकीची माहिती देतेय आणि पब्लिसिटीसाठी आजारपणाचा वापर करतेय, असा रोझलिनचा आरोप आहे.
कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाही हिनाने रोजा केला होता. त्यावरूनही रोझलिनने प्रश्न उपस्थित केला होता. “कॅन्सरच्या रुग्णासाठी उपचारादरम्यान रोजा करणं शक्यच नाही. कारण शरीराला योग्य आहाराची खूप गरज असते”, असं रोझलिन म्हणाली होती.
