7 जोड्यांना पछाडत ‘या’ जोडप्याने जिंकली ‘पती पत्नी और पंगा’ची ट्रॉफी; एकेकाळी घटस्फोटापर्यंत वाढलेला वाद

जवळपास तीन महिन्यांनंतर 'पती पत्नी और पंगा' या शोचा समारोप झाला आहे. 16 नोव्हेंबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले पार पडला. अंतिम फेरीत दोन जोड्यांमध्ये चुरस रंगली होती. अखेर टीव्हीवरील एका प्रसिद्ध जोडीने ट्रॉफी आपल्या नावे केली.

7 जोड्यांना पछाडत या जोडप्याने जिंकली पती पत्नी और पंगाची ट्रॉफी; एकेकाळी घटस्फोटापर्यंत वाढलेला वाद
pati patni aur panga
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2025 | 9:02 AM

‘बिग बॉस 14’नंतर आता टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी ‘पती पत्नी और पंगा’चं विजेतेपदही आपल्या नावे केलं आहे. हे दोघं या शोच्या पहिल्या सिझनचे विजेते ठरले आहेत. ट्रॉफीसोबतचा त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या रिअॅलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये दोन जोडप्यांमध्ये चुरस रंगली होती. एका बाजूले रुबिना आणि अभिनव होते, तर दुसऱ्या बाजूला गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी होते. या शोची परीक्षक सोनाली बेंद्रेनं विजेता म्हणून रुबिना आणि अभिनव यांच्या नावाची घोषणा केली.

‘पती पत्नी और पंगा 1’चा हा सिझन ऑगस्ट 2025 मध्ये सुरु झाला होता. जवळपास तीन महिने चाललेल्या या शोचा ग्रँड फिनाले 16 नोव्हेंबर रोजी पार पडला. यानंतर ‘लाफ्टर शेफ्स’चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून हा सिझन ओटीटी आणि टीव्हीवर प्रसारित होणार आहे. ‘पती पत्नी और पंगा’मध्ये हिना खान, स्वरा भास्कर, गीता फोगाट, सुदेश लहरी, देबिनी बॅनर्जी, ईशा मालवीय, अभिषेक कुमार आणि अविका गौर त्यांच्या खऱ्या आयुष्यातील पार्टरनसोबत सहभागी झाले होते.

‘पती पत्नी और पंगा’च्या ट्रॉफीनेही अनेकांचं लक्ष वेधलंय. लाडूंच्या डिझाइनची ही खास ट्रॉफी आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून या शोने पती-पत्नी म्हणून आम्हाला एकमेकांसोबत घालवण्यासाठी चांगला वेळ दिला, अशी प्रतिक्रिया रुबिना आणि अभिनवने जिंकल्यानंतर दिली. ‘बिग बॉस 14’नंतर रुबिना आणि अभिनव बऱ्याच काळानंतर एखाद्या शोसाठी अशाप्रकारे एकत्र आले. बिग बॉसमध्ये असताना या दोघांच्या नात्यातील तणाव चर्चेत होता. इतकंच नव्हे तर बिग बॉसनंतर दोघं घटस्फोटसुद्धा घेणार असल्याची चर्चा होती. परंतु नंतर दोघांनी एकमेकांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला. रुबिना आणि अभिनव यांना जुळी मुली आहेत.

शो जिंकल्यानंतर रुबिना आणि अभिनव म्हणाले, “आम्ही दोघांनीही या शोमुळे एकमेकांसोबत बराच वेळ घालवला आहे. एक जोडी म्हणून आम्ही परिपूर्ण नाही, पण एक जोडपं म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. ही ट्रॉफी जिंकणं आम्हा दोघांसाठीही खूप खास आहे. प्रेक्षकांकडून आम्हाला मिळालेलं प्रेम याचा पुरावा आहे. आम्हालाही या शोमध्ये खूप मजा आली. दिवस चांगला असो किंवा वाईट.. अखेर एकमेकांची निवड करणे याचाच अर्थ आमच्यासाठी प्रेम आहे.”