रुईया कॉलेजच्या अक्षताची मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीसाठी निवड; कोण आहे ती?

'बाई तुझा आशीर्वाद' ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून यामध्ये रुईया कॉलेजमधून शिकलेल्या अक्षता प्रमोदची मुख्य भूमिका आहे. या मालिकेत ती अवनीची मुख्य भूमिका साकारणार आहे.

रुईया कॉलेजच्या अक्षताची मालिकेच्या मुख्य अभिनेत्रीसाठी निवड; कोण आहे ती?
अक्षता प्रमोद
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2026 | 9:59 AM

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘बाई तुझा आशीर्वाद’ ही नवी मालिका सुरू होत आहे. घराला घरपण देणारी स्त्री म्हणजेच ‘बाई’ या मालिकेच्या केंद्रस्थानी आहे. ज्या घराला बाईच्या असण्याचीच सवय नाही, अशा पूर्णपणे पुरुषप्रधान घरात अवनीचं आगमन होतं आणि तिथूनच नात्यांचा नवा प्रवास सुरू होतो. तिच्या येण्याने त्या घरात फक्त एक व्यक्ती नाही, तर समज, संवाद, आपुलकी आणि घरपण येतं. घराला घरपण देणाऱ्या अवनीची भूमिका नवोदित अभिनेत्री अक्षता अनिता प्रमोद साकारणार आहे.

रुईया कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात ड्रिग्री घेतलेल्या अवनीला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्र खुणावत होतं. सात वर्षांची असतानाच तिने कथ्थक शिकायला सुरुवात केली. अवनीच्या नृत्यकलेतूनच तिला तिच्या आयुष्यातली ‘स्टार’ ही पहिली एकांकिका मिळाली होती. ही एकांकिका खूप गाजली. त्यानंतर ‘गुड बाय किस’, ‘अत्तरमन’ अशा अनेक एकांकिका अवनीने केल्या. याच दरम्यान तिला ‘बाई तुझा आशीर्वाद’ या मालिकेतल्या अवनी या मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अवनी दिसायला सुंदर.. बोलायला लाघवी.. मीतभाषी. घरात आई-बाबांची लाडकी असली तरी तिला आई वडिलांच्या प्रेमळ शब्दांपुढे आपला हट्ट रेटता येत नाही. अवनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग कसा करणार याची गोष्ट मालिकेतून उलगडेल.

अवनी या भूमिकेप्रमाणेच अक्षता देखिल खूप महत्त्वाकांक्षी आहे. खऱ्या आयुष्यातही अभ्यासात प्रचंड हुशार आणि सतत नवं काहीतरी करण्याची धडपड यामुळेच अवनी हे पात्र खूप भावल्याचं अक्षता म्हणते. त्यामुळेच ही मालिका केवळ एक अभिनयाची संधी नसून स्वत:ला व्यक्त करायची संधी असल्याची भावना अवनीने व्यक्त केली.

सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि सुनील तावडे यांच्यासह अक्षता अनिता प्रमोद, अर्णव वॅरिअर, पुष्कर सराड, सतीश तांदळे, राघव वर्तक असे अनेक नवोदित कलाकार या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती निखिल शेठ आणि विनोद लव्हेकर यांच्या पोतडी या निर्मिती संस्थेने केली असून विनोद लव्हेकरच या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. अमोल पाटील या मालिकेच्या लेखनाची जबाबदारी पार पाडणार आहेत.

Follow Us