पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं सेलिब्रिटींना महत्त्वाचं आवाहन

अनुपमा या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुपाली गांगुलीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सेलिब्रिटींना आणि इन्फ्लुएन्सर्सना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. रुपालीच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीबद्दल प्रसिद्ध अभिनेत्रीचं सेलिब्रिटींना महत्त्वाचं आवाहन
Rupali Ganguly
Image Credit source: Instagram
| Updated on: May 14, 2025 | 10:20 AM

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. भारतीय सैन्याने हवाई हल्ले करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या सीमेवरील राज्यांमध्ये ड्रोन हल्ले केले. या हल्ल्याला भारताकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. भारत आणि पाकिस्तानमध्ये हा संघर्ष सुरू असतानाच तुर्कस्तानने पाकिस्तानला चिथावणी मिळेल अशी कृती केली. भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असताना तुर्की सैन्याच्या काही हालचालींनी भारताचं लक्ष वेधून घेतलं. तुर्कस्तानी लष्कराची ‘सी-130 ई’ ही लष्करी मालवाहू विमानं कराची विमानतळावर उतरल्याचं समोर आलं. यानंतर आता टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका रुपाली गांगुलने भारतीयांना तुर्कीच्या टूरिझ्मवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. तुर्कीला फिरायची प्लॅनिंग केली असेल तर ते रद्द करा, अशी विनंती तिने भारतीय सेलिब्रिटींना, इन्फ्लुएन्सर्सना आणि पर्यटकांना केली आहे.

‘अनुपमा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुपाली गांगुलीने यासंदर्भात तिच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘कृपया आपण तुर्कीचे बुकिंग्स रद्द करू शकतो का? मी सर्व भारतीय सेलिब्रिटींना, इन्फ्लुएन्सर्सना आणि पर्यटकांना ही विनंती करत आहे. भारतीय म्हणून आपण किमान एवढं तरी करू शकतो’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. त्याचसोबत ‘#BoycottTurkey’ असा हॅशटॅगसुद्धा जोडला आहे. रुपालीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘यापुढे मी कधीच अझरबायजान, तुर्की आणि चीनला जाणार नाही’, असं एकाने लिहिलं. तर ‘अर्थातच, आता आपलं कर्तव्य बजावण्याची वेळ आली आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मी लंडनमध्ये राहत असून तुर्कीला दहा दिवसांच्या ट्रिपला जाण्याचा प्लॅन केला होता. परंतु आता मी प्लॅन रद्द केले आहेत’, अशीही माहिती एका युजरने दिली.

भारताबरोबर युद्धाची शक्यता निर्माण झाल्याने कंगाल पाकिस्तानला तुर्कस्तानमधून तातडीने दारूगोळा पाठविण्यासाठी तिथल्या लष्कराची विमानं कराचीला आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. तुर्कस्तानने अर्थातच हा दावा फेटाळला असून केवळ इंधन भरण्यासाठी विमानं काही काळ कराचीमध्ये उतरली आणि नंतर लगेचच मार्गाला लागली, असं स्पष्टीकरण तुर्कस्तानचे अध्यक्ष तय्यिप रेसेप एर्दोगन यांच्या संभाषम संचालनालयाने सोशल मीडियाद्वारे दिलं. पाकिस्तान-तुर्कस्तानचे लष्करी संबंध हे पूर्वापार आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच एकमेकांचे राजकीय समर्थक राहिले आहेत.