
मराठमोळा विनोदवीर सागर कारंडेची 61 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली होती. ज्यामुळे सागर कारंडे याच्या चाहत्यांनी चिंता देखील व्यक्त केली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी 3 अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला. गेल्या काही दिवसांपासून याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत असून सायबर फसवणुकी प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. ज्यामुळे याप्रकरणातील सत्य लवकरच सर्वांसमोर येईल.
सागर कारंडे फसवणुकीमुळे चर्चेत आल्यानंतर खुद्द अभिनेत्याने 5 एप्रिल रोजी यावर प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे 61 लाख रुपये कसे असतील? असा प्रश्न देखील अभिनेत्याने उपस्थित केलेला. ‘यामध्ये काहीही तथ्य नाही. असं काहीही झालेलं नाही. माझ्याकडे 61 लाख रुपये कसे असतील? एवढे पैसे माझ्याकडे असते तर, बाकीच्या गोष्टी का केल्या असत्या. मा एखाद्या नाटकाची निर्मिती केली असती… 61 लाख रुपये ही माझ्यासाठी फार मोठी रक्कम आहे…’
61 लाख रुपयांचा फसवणुकीमुळे चर्चेत असणारा सागर कारंडे म्हणाला, ‘याप्रकरणी मी पोलिसांची मदत घेणार आहे. मी अब्रू नुकसानीचा दावा देखील दाखल करणारा आहे.’ चाहत्यांबद्दल अभिनेता म्हणाला, ‘असं काही घडलंच नाही त्यामुळे चाहते दुखावण्याचा प्रश्नच येत नाही… सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे… कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये… एवढं सरळ आणि साधं काम आहे…’ असं देखील सागर म्हणाला.
काही दिवसांपूर्वी सागर कारंडे याची 61 लाखांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली. एका अनोळखी महिलेने सागर कारंडेला 25 फेब्रुवारी रोजी एक व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. व्हॉट्सअॅपवरून सागर कारंडे आणि तिच्यात बोलणं झाल्याची देखील माहिती समोर आली. त्यावेळी महिलेने त्याला एक स्किम सांगितली होती. तिने इन्स्टाग्रामवरील काही पोस्ट ‘लाईक’ करण्याचे काम देऊ केलं होतं आणि प्रत्येक लाईकसाठी 150 रुपये मिळतील, असे देखील सांगितले होते.
दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असेही तिने म्हटलं होतं. सागरने तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला. त्या महिलेने तब्बल 61 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. त्यानंतर सागरने तात्काळ पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली आणि तक्रार दाखल केली. सध्या सायबर क्राईम विभाग या प्रकरणाची कसून चौकशी करत आहे.
पण सागर कारंडेने यावर प्रतिक्रिया देत तो व्यक्ती मी नाही… माझ्यासोबत असे काही घडले नाही… मी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आणि आता याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतंल आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.