
अभिनेत्री अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेनं ‘सैय्यारा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अहानच्या करिअरमधील पहिल्यावहिल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. यामध्ये त्याच्यासोबत अनीत पड्डा या अभिनेत्रीने मुख्य भूमिका साकारली आहे. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मोहित सुरीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत 2025 मधील अनेक चित्रपटांच्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे.
Sacnilk ने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 24 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांच्या कमाईचा आकडा 45 कोटींवर पोहोचला आहे. ज्या गतीने या चित्रपटाची कमाई सुरू आहे, ते पाहून पहिल्याच वीकेंडच्या कमाईचा आकडा 75 कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.
अहान पांडे आणि अनित पड्डा या दोघांचा हा पहिला चित्रपट आहे. करिअरमधील पहिल्या चित्रपटात दोघांनी दमदार कामगिरी केली आहे. या चित्रपटाच्या कथेची सुरुवात वाणीच्या ब्रेकअपपासून होते. होणारा पती तिला सोडून जातो आणि त्यानंतर तिची भेट क्रिश नावाच्या एका संगीतकाराशी होते. या दोघांच्या वेदना एकसमान असतात आणि त्यातूनच एक प्रेमकथा फुलत जाते. परंतु अचानक वाणीच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे आणि आजारपणामुळे त्यात दु:खद वळण येतं. यापुढे त्यांच्या प्रेमकथेचा शेवट कसा होतो, हे चित्रपटात पहायला मिळतं.
दिग्दर्शक मोहित सुरूने कोविडच्या काळात नेटफ्लिक्सवर ‘द रोमँटिक्स’ या नावाची डॉक्युमेंट्री पाहिली आणि तिथूनच त्याला ‘सैय्यारा’ची कथा सुचत गेली. मोहितला तरुण वर्गासाठी एक लव्ह-स्टोरी बनवायची होती. नवीन कलाकारांना घेऊन हा चित्रपट बनवण्याचं त्याचं स्वप्न होतं. अखेर ते सत्यात उतरलं असून आगामी काळात हा चित्रपट कमाईचे बरेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याचं दिसतंय.