ते सलमानला ठार मारण्यासाठी..; ‘भाईजान’च्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा

दोन वर्षांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार झाला होता. या घटनेसंदर्भात त्याच्या बॉडीगार्डने न्यायालयात महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. बॉडीगार्ड नेमकं काय म्हणाला, ते सविस्तर जाणून घ्या..

ते सलमानला ठार मारण्यासाठी..; भाईजानच्या बॉडीगार्डकडून मोठा खुलासा
सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2026 | 8:24 AM

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानला 2024 मध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. याच उद्देशाने त्याच्या मुंबईतील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’बाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता. यासंदर्भात आता सलमानच्या खासगी बॉडीगार्डने विशेष न्यायालयात मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यात सुरू झाली होती आणि बॉडीगार्डने साक्षीदार म्हणून सर्वांत आधी आपली साक्ष नोंदवली होती. 14 एप्रिल 2024 मध्ये दोन जणांनी दुचाकीवरून सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. सलमानचा बॉडीगार्डच या प्रकरणातील तक्रारदारसुद्धा आहे. गेल्या महिन्यात त्याने साक्ष दिली होती की 13 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास तो त्याच्या नियमित नाइट शिफ्टच्या ड्युटीवर हजर झाला होता. त्याने न्यायालयाला हेदेखील सांगितलं की, गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्यावेळी सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती.

“14 एप्रिल 2024 रोजी पहाटे 4 वाजताच्या सुमारास सुरक्षा पथकाला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. मी सीसीटीव्ही स्क्रीनकडे पाहिलं, तेव्हा मला हेल्मेट घातलेले बाइकवरील दोन माणसं इमारतीच्या दिशेने गोळीबार करताना दिसले. हल्लेखोरानी चार ते पाच गोळ्या झाडल्या. त्यामुळे मी आणि तिथे उपस्थित असलेले इतर बॉडीगार्ड ताबडतोब मुख्य दरवाजातून बाहेर पळालो. त दोन हल्लेखोर नंतर उजवीकडे ‘आय लव्ह बांद्रा’ पॉईंटच्या दिशेने आणि तिथून मेहबूब स्टुडिओ रोडवर पळून गेले”, अशी माहिती सलमानच्या बॉडीगार्डने दिली.

या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील महेश मुळे यांच्यामार्फत सरकारी पक्षाने न्यायालयात सीसीटीव्ही फुटेज सादर केले, ज्यामध्ये एक बाइक गेटच्या दिशेने येताना दिसत होती. एका साक्षीदाराने ती ओळखली. यावेळी बॉडीगार्डने सांगितलं की, हल्ल्याच्या वेळी सलमान पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या बेडरुममध्ये होता. हा गोळीबार म्हणजे सलमानला जीवे मारण्याचाच प्रयत्न होता, असा दावा बॉडीगार्डने केला.

विकी गुप्ता आणि सागर पाल या दोन हल्लेखोरांनीच सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद रफीक सरदार चौधरीने गोळीबाराच्या दोन दिवस आधी गॅलेक्सी अपार्टमेंटची पाहणी केली होती. त्या परिसराचा व्हिडीओ बनवून तो या प्रकरणातील वाँटेड आरोपी अनमोल बिष्णोईला पाठवला होता. विकी गुप्ता आणि सागर पाल हे सध्या इतर आरोप सोनू कुमार बिष्णोई, मोहम्मद रफीक चौधरी आणि हरपाल सिंह यांच्यासोबत न्यायालयीन कोठडीत आहे. या आरोपींपैकी एक अनुज कुमार थापन याने पोलीस कोठडीत असताना आत्महत्या केली.

Follow Us