गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने सोडलं मौन, म्हणाला….

| Updated on: Apr 15, 2024 | 8:54 PM

आमच्या कुटुंबाशी जवळीक असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक मीडियासमोर बिनधास्त विधाने करत आहेत की, हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कुटुंबावर काहीही परिणाम होत नाही, जे खरे नाही आणि ही मते गांभीर्याने घेतली जाऊ नयेत", असं आवाहन अरबाज खान यांनी केलं आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने सोडलं मौन, म्हणाला....
अरबाज खान आणि सलमान खान
Follow us on

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुंबई पोलीस या गोळीबार प्रकरणातील आरोंपीचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. गोळीबाराची घटना ही रविवारी सकाळी घडली. दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीच्या दिशेला गोळीबार केला. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर वेगवेगळे दावे करण्यात येत होते. पण या घटनेवर सलमान खानचा भाऊ अरबाज खान याने मौन सोडलं आहे. अरबाजने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर घडलेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच सलीम खान कुटुंबाकडून कुणीही या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे याबाबत व्हायरल झालेले वृत्त खोटे असल्याचं अरबाज खानने स्पष्ट केलं आहे.

‘ही मते गांभीर्याने घेतली जाऊ नयेत’

“अलीकडेच सलीम खान कुटुंबियांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना अतिशय धक्का देणारी आणि अस्वस्थ करणारी आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेने आमचे कुटुंब हादरले आहे. दुर्दैवाने आमच्या कुटुंबाशी जवळीक असल्याचा दावा करणारे आणि प्रवक्ते असल्याचे भासवणारे काही लोक मीडियासमोर बिनधास्त विधाने करत आहेत की, हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे आणि कुटुंबावर काहीही परिणाम होत नाही, जे खरे नाही आणि ही मते गांभीर्याने घेतली जाऊ नयेत”, असं आवाहन अरबाज खान यांनी केलं आहे.

‘आम्ही मीडियासमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही’

“सलीम खान कुटुंबातील कोणत्याही सदस्याने या घटनेबाबत मीडियासमोर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. यावेळी या अनुचित घटनेच्या तपासात कुटुंबीय पोलिसांना मदत आणि सहकार्य करत आहेत. आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे आणि आमच्या कुटुंबाचे रक्षण आणि सुरक्षिततेसाठी ते त्यांच्या क्षमतेनुसार सर्व काही करतील, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार”, अशी प्रतिक्रिया अरबाज खान यांनी दिली.

एका आरोपीची ओळख पटली

या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी एका आरोपीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्यांचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलीस आरोपींना शोधण्यासाठी दिवस-रात्र तपास करत आहेत.