
अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताने सर्वांना धक्का बसला आहे. सामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूड देखील या घटनेनं हादरलं आहे. सेलिब्रिटी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त करत आहेत. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.
एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर सलमान खानचा मोठा निर्णय
दरम्यान, आता या घटनेनंतर सलमान खानने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याने त्याचा एक कार्यक्रम रद्द केला आहे. सलमान सुपरस्टार इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या लाँच कार्यक्रमात सहभागी होणार होता पण आता विमान अपघातानंतर त्याने कार्यक्रम आयोजकांसह तो पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मुंबईत एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. अपघाताची बातमी पसरल्यानंतर, टीमने पत्रकारांना संबोधित केले आणि कार्यक्रम रद्द केला.
‘या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत आहोत…’
कार्यक्रमाच्या आयोजकांनी एक प्रेस नोट देखील पाठवली आहे. त्यांनी म्हटलं आहे “तुम्हाला माहिती आहेच की, आदल्या दिवशी एक दुःखद घटना घडली. हा सर्वांसाठी एक दुःखद क्षण आहे. या कठीण काळात ISRL आणि सलमान खान देशासोबत एकजुटीने उभे आहेत. हा उत्सव साजरा करण्याची वेळ नसल्यामुळे आम्ही कार्यक्रम पुढे ढकलण्याचा संयुक्त निर्णय घेतला आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही पीडितांच्या कुटुंबासोबत आहोत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत. खंबीर राहा.
विमान अपघाताने बॉलिवूड स्टार्संनाही धक्का
अहमदाबादमधील विमान अपघाताबद्दल अनेक बॉलिवूड स्टार्सनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमारने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले ‘एअर इंडियाच्या अपघाताने मी धक्का बसलो आहे. मी सध्या फक्त प्रार्थना करत आहे.’ सनी देओलने लिहिले ,”अहमदाबादमधील दुःखद विमान अपघाताची बातमी ऐकून मी दु:खी आणि अजूनही धक्क्यात आहे. सर्व प्रवाशांसोबत, त्यांच्या कुटुंबियांसह आणि प्रभावित झालेल्या सर्वांसोबत माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात, मी सर्वांसाठी मनापासून प्रार्थना करत आहे.’ अशा अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.