सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा; अक्षय कुमार, अनुमप खेर यांनाही पोलीस संरक्षण

| Updated on: Nov 01, 2022 | 12:43 PM

सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या धमकीनंतर उचललं मोठं पाऊल

सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा; अक्षय कुमार, अनुमप खेर यांनाही पोलीस संरक्षण
सलमानला Y+ दर्जाची सुरक्षा; अक्षय कुमार, अनुमप खेर यांनाही पोलीस संरक्षण
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- महाराष्ट्र सरकारकडून अभिनेता सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येमागे असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानच्या जीवाला धोका असल्याचं कळतंय. याच सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्र सरकाराने सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.

सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जूनमध्ये धमकीचं पत्र मिळालं होतं. सलीम खान यांच्या सुरक्षारक्षकांनी ते पत्र पाहिलं. तुझाही मूसेवाला करू, अशी धमकी त्यात सलमान आणि सलीम यांना देण्यात आली होती. सिद्धू मूसेवालाची पंजाबमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याचाच संदर्भ या धमकीच्या पत्रात देण्यात आला होता. या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली. त्यापैकी काहींनी सलमानला लक्ष्य केल्याची कबुली दिली.

सलमानला मुंबई पोलिसांकडून नेहमीच संरक्षण देण्यात आलं होतं. मात्र आता मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार, त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. म्हणजेच त्याच्यासोबत चार सशस्त्र सुरक्षा कर्मचारी असतील. तर अक्षय कुमारला एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. एक्स दर्जाच्या सुरक्षेत तीन सुरक्षा अधिकारी शिफ्ट्समध्ये काम करतात. अनुपम खेर यांनाही त्याच दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. या सुरक्षेचा खर्च सेलिब्रिटीच उचलणार असल्याचं म्हटलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई, पंजाब आणि दिल्लीत केलेल्या तपासात हे उघड झालं होतं की लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रारच्या गुंडांनी सलमानला मुंबईत जीवे मारण्याचा प्लॅन केला होता. या गुंडांनी 2017 मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी वांद्रे इथल्या घराबाहेर आणि 2018 मध्ये पनवेल फार्महाऊसजवळ त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता.

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर धमक्या मिळाल्याने अनुपम खेर यांना सुरक्षा देण्यात आली आहे. तर अक्षय कुमारला त्याच्या राष्ट्रीयत्वावरून सोशल मीडियावर ज्या धमक्या मिळाल्या, त्यामुळे सुरक्षा पुरविण्यात आली आहे.