
काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 'सिकंदर'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सलमानचे पापाराझींनी क्लोज अप फोटो क्लिक केले होते. या फोटोंमध्ये त्याचं वय दिसून येत होतं. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.

‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले होते. अशा ट्रोलर्सना आता सलमानने त्याच्याच अंदाजात उत्तर दिलं आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.

हे फोटो जिममधील असून सलमान त्यात वर्कआऊट करताना दिसत आहे. यातल्या पहिल्या फोटोमध्ये सलमानची शरीरयष्टी स्पष्ट पहायला मिळतेय. 'प्रेरणेसाठी धन्यवाद..' असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत. ट्रोलिंगमुळे जिममध्ये आणखी मेहनत घेण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्याने म्हटलंय.

59 व्या वर्षीही मी अत्यंत फीट आहे, असा संदेश सलमानने या फोटोंमधून ट्रोलर्सना दिला आहे. त्याच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'सिकंदर'च्या ट्रेलर लाँचदरम्यानही सलमानने ट्रोलर्सना उत्तर दिलं होतं. “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे”, असं तो म्हणाला होता.