Salman Khan: हाच माझा खरा प्रॉब्लेम; रिलेशनशिपबद्दल सलमान खानची बिग बॉसमध्ये स्पष्ट कबुली

Bigg Boss 20: बिग बॉसच्या विसाव्या सिझनचा प्रीमिअर पार पडत असून या शोमध्ये बिग बॉस आणि सलमान खान यांच्यातील मजेशीर संवाद चर्चेत आला आहे. सलमान खानने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल भाष्य केलं आहे.

Salman Khan: हाच माझा खरा प्रॉब्लेम; रिलेशनशिपबद्दल सलमान खानची बिग बॉसमध्ये स्पष्ट कबुली
सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Sep 06, 2026 | 9:50 PM

‘बिग बॉस 20’च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात झाली असून नेहमीप्रमाणेच सलमान खानने आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. यंदाचा सिझन सुरू होताच सलमान आणि ‘बिग बॉस’ यांच्यात झालेला एक मजेशीर संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या संवादात दोघांनीही आपल्या सिंगल स्टेटसबद्दल मिश्कील अंदाजात भाष्य केलं. ‘बिग बॉस 20’च्या प्रीमियरदरम्यान सलमान खानने बिग बॉसला तब्बल 20 वर्षांच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. “वीस वर्षांच्या तुम्हाला शुभेच्छा, बिग बॉस. वीस वर्षांत खूप काही बदललं,” असं सलमान म्हणाला. त्यावर बिग बॉसनेही मजेशीर उत्तर देत या दोन दशकांमध्ये स्पर्धकांचं स्टेटस बदलल्याचं सांगितलं.

“स्पर्धकांचे स्टेटस बदलले,” असं बिग बॉस म्हणताच सलमानने त्याला लगेच एक मजेदार ट्विस्ट दिला. “पण तुम्ही आणि मी अजूनही सिंगलच आहोत,” असं सलमानने म्हटलं. त्यावर बिग बॉसनेही मिश्कील अंदाजात “म्हणूनच खुश आहोत,” असं उत्तर दिलं. या संवादामुळे प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. मात्र, सलमानने त्यानंतर स्वतःच्या रिलेशनशिप स्टेटसबाबत केलेलं वक्तव्य आणखी चर्चेत आलं. बिग बॉसच्या ‘सिंगल’ राहण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना सलमान म्हणाला, “पण मला मिंगलसुद्धा व्हायचं नाहीये, हाच तर खरा प्रॉब्लेम आहे.” सलमानच्या या वाक्यावर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

सलमान खानच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि लग्नाबाबत नेहमीच चर्चा होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या लग्नाचा विषय चाहत्यांमध्ये उत्सुकतेचा राहिला आहे. मुलाखती असोत किंवा सार्वजनिक कार्यक्रम, सलमानला अनेकदा लग्नाबाबत प्रश्न विचारले जातात. मात्र, सलमान नेहमीच त्याच्या खास विनोदी शैलीत या प्रश्नांना उत्तर देताना दिसतो. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या प्रीमियरमध्येही त्याने त्याच शैलीत त्याच्या सिंगल स्टेटसवर भाष्य केलं.

‘बिग बॉस’च्या 20 वर्षांच्या प्रवासात अनेक स्पर्धकांची आयुष्यं बदलली, काहींचं करिअर बहरलं, तर काहींना प्रेम आणि नात्यांमध्ये नवी सुरुवात मिळाली. पण सलमान आणि बिग बॉस मात्र अजूनही सिंगल असल्याची मजेशीर कबुली खुद्द शोच्या प्रीमियरमध्येच देण्यात आली. आता या सिझनमध्ये पुढे काय काय घडणार, याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us