‘टायगर 3’मधल्या अभिनेत्याचं निधन; पंजाबचा ‘आयर्नमॅन’ म्हणून होती ओळख

अभिनेता आणि बॉडीबिल्डर वरिंदर घुमनचं निधन झालं आहे. ऑपरेशनदरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झाल्याचं वृत्त आहे. त्याच्या निधनाने पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

टायगर 3मधल्या अभिनेत्याचं निधन; पंजाबचा आयर्नमॅन म्हणून होती ओळख
सलमान खान आणि वरिंदर घुमन
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 10:11 PM

पंजाबचा ‘आयर्नमॅन’ म्हणून ओळखला जाणारा बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर घुमनचं निधन झालं. वयाच्या 41 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ऑपरेशनदरम्यान वरिंदरला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याचं निधन झालं. ‘डीएनए’नं दिलेल्या वृत्तानुसार, वरिंदरला खांद्याच्या ऑपरेशनसाठी अमृतसरच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जेव्हा त्याच्यावर ऑपरेशन सुरू होतं, तेव्हाच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळे त्याची प्राणज्योत मालवली. वरिंदरच्या निधनाच्या वृत्ताने पंजाबी इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. वरिंदर अभिनेत्यासोबतच बॉडीबिल्डरसुद्धा होता.

अमृतसरमधील फोर्टीस रुग्णालयात तो बायसेप्सच्या दुखापतीवर किरकोळ ऑपरेशन करण्यासाठी गेला होता. घरून तो एकटाच निघाला होता. ऑपरेशननंतर त्याला लगेचच आज डिस्चार्ज मिळणार होता. परंतु अचानक त्याला ऑपरेशनदरम्यान हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं.

वरिंदरने ‘मिस्टर आशिया’ स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक पटकावला होता. 2011 मध्ये तो ऑस्ट्रेलियन ग्रांपीमध्ये यशस्वी झाला होता. त्याने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही भाग घेतला होता. वरिंदरने पंजाबी चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही काम केलंय. सलमान खानच्या ‘टायगर 3’ आणि 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मरजावां’ या चित्रपटामध्ये त्याने भूमिका साकारली होती.

वरिंदर हा जगातील पहिला शाकाहारी बॉडीबिल्डर होता. तो आयएफबीबी (इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस) प्रो कार्ड मिळवणारा पहिला भारचीय बॉडीबिल्डर होता. त्याने लहानपणापासूनच बॉडीबिल्डिंग स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली होती. 2005 मध्ये तो ‘मिस्टर जालंधर’ बनला होता. त्याच वर्षी त्याने मिस्टर पंजाबचाही किताब जिंकला होता. तर 2008 मध्ये तो मिस्टर इंडिया बनला. वरिंदर पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्याचा आहे. याच जिल्ह्यातून प्रेमचंद देगरा आणि योगेश सॅननसारखे आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर आणि बॉडीबिल्डर्स तयार झाले. वरिंदरचे आजोबा हॉकीपटू होते. तर त्याचे वडील भूपिंदर सिंग कबड्डीपटू होते. वरिंदरच्या कुटुंबीयांकडे अनेक पाळीव गुरं होती. त्यामुळे दूध आणि तूप यांची कधीच त्याला कमतरता भासली नव्हती. तिथूनच तो शाकाहारी बॉडीबिल्डर होण्यासाठी प्रेरित झाला होता.