घटस्फोटाबद्दल नाग चैतन्यच्या वक्तव्यानंतर समंथाने रिलेशनशिपबद्दल शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

नाग चैतन्य आणि समंथाने 2017 मध्ये गोव्यात धूमधडाक्यात लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. तर समंथाचं नाव दिग्दर्शक राजशी जोडलं जातंय.

घटस्फोटाबद्दल नाग चैतन्यच्या वक्तव्यानंतर समंथाने रिलेशनशिपबद्दल शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत
Samantha Ruth Prabhu
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2025 | 11:16 AM

घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य त्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. एका मुलाखतीत नाग चैततन्यने अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटाबाबत मौन सोडलं होतं. या मुलाखतीत त्याने नेमकं कारण सांगितलं नसलं तरी दोघांनी मिळून एकमेकांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्याने स्पष्ट केलं. यानंतर समंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेल्या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी न घेतल्याने कशा पद्धतीने एखादं नातं संपुष्टात येऊ शकतं, याविषयी सांगणारा व्हिडीओ आहे. ब्रिटीश लेखक जय शेट्टीने रिलेशनशिपबद्दल हे मत मांडलंय. त्याचाच व्हिडीओ समंथाने इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये जय शेट्टी म्हणतो, “तुम्हाला एक अविश्वसनीय जोडीदार आणि एक अविश्वसनीय नातं मिळू शकतं. ज्यामध्ये खरं प्रेम असण्याची क्षमता आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत नसाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने उपस्थित राहू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दल सर्वकाही परफेक्ट असू शकतं. सर्वकाही बरोबर असू शकतं. परंतु तुम्ही तुमचं स्वत:चं शरीर आणि मन यांचं स्वास्थ्य न बाळगल्याने कदाचित त्या व्यक्तीला, नात्याला गमावू शकता.”

समंथा अनेकदा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याविषयी मोकळेपणे बोलताना आणि त्यासंदर्भातील व्हिडीओ, पोस्ट शेअर करताना दिसते. समंथाला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं आहे. या आजाराचा सामना करताना ती मानसिक स्वास्थ्याचंही महत्त्व अधोरेखित करताना दिसतेय.

दरम्यान नाग चैतन्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, तो आणि समंथा आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत. मात्र आजही दोघांच्या मनात एकमेकांविषयी खूप आदर आहे. “मी स्वत:ला एका अशा कुटुंबातून आलोय, जिथे नाती मोडलेली आहेत. त्यामुळे एखादं रिलेशनशिप संपवताना मी हजार वेळा विचार करतो. आम्हा दोघांना आपापल्या मार्गाने पुढे जायचं होतं. आमच्या वैयक्तिक कारणांमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलोय. मला माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळालंय. त्यामुळे मी खूप खुश आहे. आमच्या मनात एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे”, असं तो म्हणाला.