या शापित सिनेमाला बनवण्यासाठी लागली 23 वर्षे; प्रदर्शनापूर्वीच दोन अभिनेते, दिग्दर्शकाचं निधन
चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील या सर्वांत दुर्दैवी चित्रपटाला बनवायला तब्बल 23 वर्षे लागली होती. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यातील अभिनेते आणि दिग्दर्शकांचं निधन झालं होतं. हा कोणता चित्रपट ते जाणून घ्या..

आजवर बॉलिवूडमध्ये असे असंख्य चित्रपट बनले आहेत, ज्यांच्या यशाची चर्चा वर्षानुवर्षे होत असते. तर दुसरीकडे असेही काही चित्रपट आहेत, ज्यांच्याबद्दल कोणी बोलायलाही तयार होत नाही. असाच एक चित्रपट जवळपास चाळीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आता हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत दुर्दैवी चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे हा चित्रपट बनवण्यासाठी तब्बल 23 वर्षांचा काळ लागला होता. याच काळात चित्रपटातील दोन मुख्य अभिनेते आणि दिग्दर्शक यांचं निधन झालं होतं.
प्रत्येक चित्रपट निर्माता आणि कलाकार त्यांना यशाच्या नव्या उंचीवर पोहोचणाऱ्या चित्रपटाचा भाग बनण्याचं स्वप्न पाहत असतात. मात्र काही चित्रपट दुर्दैवी ठरतात आणि त्या कलाकारांच्या करिअरमधील एक काळा डाग बनतात. असाच एक चित्रपट बॉलिवूडमध्ये होऊन गेला असून त्याला बनवायला तब्बल 23 वर्षे लागली होती. तरीही तो बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. 1986 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात संजीव कुमार आणि अभिनेत्री निम्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘लव्ह अँड गॉड’ असं या चित्रपटाचं नाव आहे.
प्रदर्शनाआधीच अभिनेते, दिग्दर्शकांचं निधन
आयएमडीबीने दिलेल्या माहितीनुसार, ‘मुघल-ए-आझम’चे दिग्दर्शक के. आसिफ जे करीमुद्दीन आसिफ म्हणूनही ओळखले जातात, त्यांनी 1963 मध्ये ‘लव्ह अँड गॉड’ बनवण्याची जबाबदारी स्वीकारली होती. सुरुवातीला गुरू दत्त हे या चित्रपटातील मुख्य अभिनेते होते. त्यांनी काही भागाचं शूटिंगसुद्धा केलं होतं. मात्र 1964 मध्ये त्यांच्या निधनामुळे या चित्रपटाचं काम थांबवण्यात आलं होतं. काही वर्षांनंतर अभिनेते संजीव कुमार यांची मुख्य अभिनेते म्हणून निवड झाली होती. तेव्हा 1970 मध्ये पुन्हा हा चित्रपट मार्गी लागला होता. याच काळात के. आसिफ यांचंही निधन झालं. तेव्हा ‘लव्ह अँड गॉड’ पुन्हा एकदा रखडला. के. आसिफ यांच्या पत्नी अख्तर आसिफ यांनी हा चित्रपट अखेर पूर्ण केला. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच संजीव कुमार यांचंही निधन झालं.
हा चित्रपट अखेर 27 मे 1986 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यामुळे ‘लव्ह अँड गॉड’ हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वांत दुर्दैवी चित्रपट म्हणून ओळखला जाऊ लागला. या चित्रपटात संजीव कुमार आणि निम्मी यांच्याव्यतिरिक्त अभिनेते प्राण आणि अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांच्याही भूमिका होत्या.