‘जमिनीवरचा देव दावलास..’; सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत

पुण्यातील एका कार्यक्रमात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने हजेरी लावली होती. अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं. या कार्यक्रमानंतर संकर्षणने सोशल मीडियावर सचिनसोबतचा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

जमिनीवरचा देव दावलास..; सचिन तेंडुलकरच्या भेटीनंतर संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत
Sachin Tendulkar and Sankarshan Karhade
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2025 | 1:29 PM

‘क्रिकेटचा देव’ अर्थात भारतरत्न सचिन तेंडुलकरने रविवारी पुण्यातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या व्यवसायाला 75 वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माधव श्रीकृष्ण, संजय, केदार आणि इंद्रनील या चितळे परिवारासह असंख्या चाहत्यांच्या उपस्थितीत पंडित फार्म्स इथं झालेल्या या सोहळ्यात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी सचिनला बोलतं केलं. तर अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं या कार्यक्रमाचं निवेदन केलं. या कार्यक्रमानिमित्त संकर्षणने सचिन तेंडुलकरची भेट घेतली. या भेटीबद्दल त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. जमिनीवरचा देव दावला असं म्हणत संकर्षणने या पोस्टद्वारे आकाशातल्या देवाचे आभार मानले आहेत.

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट-

‘काय बोलायचं? फक्त अनुभवायचं. आज पुण्यात चितळे परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं निवेदन करायची संधी मिळाली. पाहुणा कोण होता? साक्षात क्रिकेटचा देव. भारतरत्न सचिन तेंडुलकर. पाच मिनिटं शांतपणे बोलता आलं. ज्या हातांनी 100 शतकं केली तो हातात घेता आला, जे पाय हजारो रन्स काढायला धावले त्यांना स्पर्श करता आला. भारतरत्न असलेल्या सचिनसोबत दोन तास मंचावरती उभं राहता आलं. ज्याच्याकडे अपेक्षेने सगळा हिंदुस्तान बघायचा, त्याने त्याची नजर माझ्यावर फिरवली. माझ्या शब्दांत माझ्या भावना ज्या अनेकांच्या मनात आहेत त्या सांगता आल्या. अजून काय पाहिजे? आकाशातल्या देवा आभार.. तू जमिनीवरचा देव दावला.

संकर्षणच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘क्या बात है’ असं जितेंद्र जोशीने म्हटलंय. तर ‘वाह वाह वाह’ असं समीर चौघुलेंनी लिहिलंय. अमृता खानविलकरनेही संकर्षणच्या पोस्टवर कमेंट केली आहे.

या कार्यक्रमात सचिन म्हणाला, “आयुष्यात कुटुंब पाठिशी असल्याशिवाय यश मिळवणं शक्य होत नाही. चांगल्या-वाईट क्षणात आपलं कुटुंबच आपल्या बरोबर असतं. माझं कुटुंब, ड्रेसिंग रुममधील सर्व सहकारी आणि तुम्हा चाहत्यांमुळेच मी कारकिर्दीत प्रत्येक टप्प्यात आत्मविश्वासाने उभा राहू शकलो.” यावेळी सचिनने युवकांना मोलाचा सल्लासुद्धा दिला. “एकवेळ यश मिळालं नाही तर चालेल, पण त्यासाठी शॉर्टकट घेणं टाळा. चुकीचे मार्ग शोधू नका. प्रयत्न करत राहा. एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळेल”, असं तो म्हणाला.