
‘बिदाई’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सारा खान नुकतीच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा क्रिश पाठकशी तिने नोंदणी पद्धतीने आंतरधर्मीय लग्न केलं. डिसेंबर महिन्यात हे दोघं निकाह आणि हिंदू पद्धतीनेही लग्नगाठ बांधणार आहेत. साराने लग्नाचे फोटो पोस्ट करताच त्यावर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु काहींनी तिला आंतरधर्मीय लग्नावरून ट्रोलसुद्धा केलं. या ट्रोलर्सना आता साराने सडेतोड उत्तर दिलं आहे. कोणताही धर्म तुम्हाला दुसऱ्या धर्माचा अनादर करायला शिकवत नाही, असं तिने थेट म्हटलंय.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत सारा म्हणाली, “आमच्या विवाहनोंदणीनंतर केलेल्या शुभेच्छांच्या आणि आशीर्वादांच्या वर्षावासाठी मी सर्वांचे खूप आभार मानते. क्रिश आणि माझी संस्कृती वेगवेगळी आहे, परंतु या दोन्ही संस्कृतींनी आम्हाला प्रेम शिकवलं आहे. आमच्या कुटुंबीयांनी सर्वांत आधी सर्वांचा आदर करण्यास शिकवलं आहे. त्याचसोबत कोणाला दुखवू नये, असंही त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. आमचीसुद्धा मतं हीच आहेत. इतरांचा आदर करा आणि जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात ठेवा, हे आम्ही लहानपणापासूनच शिकलोय. त्यामुळे आमच्या लग्नाबद्दल नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की, कृपया ही गोष्ट शिका की, कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा अपमान करायला किंवा तुच्छ लेखायला शिकवत नाही.”
“आम्ही आमच्या लग्नाचा आनंद सर्वांसोबत शेअर करतोय, त्यासाठी कोणाचीही परवानगी मागत नाही आहोत. आमचे कुटुंबीय आणि कायदा यांची परवानगी आम्हाला मिळाली आहे. माझ्या आणि माझ्या देवाच्या मधे येण्याचा अधिकार कोणालाच नाही. माझ्या देवाने मला फक्त प्रेम करायला शिकवलंय आणि मी फक्त तेच करणार आहे. कोणताच धर्म तुम्हाला वाईट गोष्टी बोलायला शिकवत नाही किंवा कोणताही धर्म तुम्हाला दुसऱ्या आयुष्यात शिरून त्यावर मतं मांडायला शिकवत नाही,” असं उत्तर तिने ट्रोलर्सना दिलं.
“जर तुम्ही धर्मावर इतकं प्रेम करता, तर इतरांवरही फक्त प्रेम करा. माझ्यामुळे वाईट गोष्टी बोलून तुम्ही स्वत:लाच का गुन्हेगार बनवत आहात? आम्ही एकमेकांच्या धर्माचा आणि संस्कृतीचा आदर करत दोन्ही पद्धतीने लग्न करणार आहोत. निकाह आणि पहाडी लग्न विधीवत पार पडणार आहेत,” असंही ती पुढे म्हणाली.
सारा खानने 2010 मध्ये तिने अभिनेता अली मर्चंटशी ‘बिग बॉस’च्या घरात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या अवघ्या वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला होता. अलीने कायदेशीर पद्धतीने लग्न केलं नसल्याचा आरोप साराने केला होता. त्याचसोबत तिने फसवणुकीची तक्रार केली होती.