केकेआरच्या टीम मीटिंग्समध्ये काय व्हायचं? शाहरुखने केला खुलासा

शाहरुख खान, जुही चावला यांच्या ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाने इंडियन प्रीमियल लीगच्या (आयपीएल) ट्रॉफीवर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. कोलकाताने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील सनरायजर्स हैदराबाद टीमवर आठ गडी आणि 57 चेंडू राखून विजय मिळवला.

केकेआरच्या टीम मीटिंग्समध्ये काय व्हायचं? शाहरुखने केला खुलासा
शाहरुख खान, गौतम गंभीर
Image Credit source: Instagram
| Updated on: May 27, 2024 | 2:09 PM

आयपीएलच्या 17 व्या हंगामात कोलकाना नाइट रायडर्स संघाने विजय मिळवल्यानंतर मालक शाहरुख खानचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. या मोठ्या विजयानंतर शाहरुखने मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने केकेआरच्या ड्रेसिंग रुममधील बऱ्याच मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. ‘स्टार स्पोर्ट्स’ला दिलेल्या या मुलाखतीत शाहरुख म्हणाला, “मला नेहमीच खेळाडू बनायचं होतं. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, मला अभिनेता कधीच बनायचं नव्हतं. पण एके दिवशी खेळताना मला दुखापत झाली आणि उपचारासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते, म्हणून मी ते स्वप्न सोडून दिलं. त्यावेळी भारतात क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधीही फार कमी होत्या. पण मला क्रीडाशी संबंधित काहीतरी नक्कीच करायचं होतं.”

केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. मात्र ज्या-ज्या वेळी टीमचा पराभव झाला, तेव्हा समिक्षकांनी केकेआरच्या काढलेल्या चुकांबद्दल खूप वाईट वाटल्याचं त्याने सांगितलं. याविषयी तो पुढे म्हणाला, “आमच्याकडे खूप चांगली टीम आहे. आमचा सतत पराभव झाला. यात सर्वांत निराशाजनक क्षण तेव्हा होता, तेव्हा एक व्यक्ती म्हणाली की फक्त त्यांचे कॉस्च्युम चांगले आहेत, त्यांचा खेळ नाही. क्रीडा समिक्षक त्यावरून कमेंट करायचे आणि ते ऐकून मला खूप वाईट वाटायचं. पराभव झाला तरी आशा कधीच सोडू नका, ही गोष्ट तुम्हाला खेळातून शिकायला मिळते.”

केकेआरने याआधी दोन वेळा जेव्हा विजेतेपद पटकावलं तेव्हा गौतम गंभीर कर्णधार होता. यंदा गौतम गंभीर या टीमचा मार्गदर्शक होता. ड्रेसिंग रुममधील गमतीजमती सांगत शाहरुख म्हणाला, “आमचा एक नियम आहे. मी जेव्हा कधी टीमच्या मिटींग्सला जायचो, तेव्हा चर्चा इतकीच असायची की प्रत्येकाने त्याच्या मनानुसार खेळावं पण यावेळी गौतमला डान्स करायची संधी मिळाली पाहिजे. आयपीएलच्या इतर मालकांसोबतही आमची चर्चा होते. विजय-पराजय यांविषयी बोलताना आम्ही हसतो. फक्त एखाद-दुसऱ्या मालकांसोबत आम्ही हे करत नाही. कारण ते ही गोष्ट खूप मनावर घेतात.”