Ramayana: श्रीराम यांना सलमान-रजनीकांत बनवलंय..; रणबीर कपूरच्या ‘रामायणा’वर मुकेश खन्ना संतापले
Ramayana: मुकेश खन्ना यांनी नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटातील काही दृश्यांवरून टीका केली आहे. मी अशा प्रकारे श्रीराम यांना ॲक्शन करताना यापूर्वी पाहिलं नव्हतं, असं ते म्हणाले.

रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसणारे भव्य सेट्स, व्हिएफएक्स आणि ॲक्शन सीन्स प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, ‘महाभारत’मध्ये भीष्म पितामहांची भूमिका साकारलेले अभिनेते मुकेश खन्ना यांनी चित्रपटातील भगवान श्रीरामांच्या चित्रणावर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुकेश खन्ना यांनी ‘बॉलिवूड नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत ‘रामायण’च्या ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या ॲक्शन सीन्सवर रोखठोक भूमिका मांडली. त्यांच्या मते, भगवान श्रीराम हे धनुर्धर होते, मात्र त्यांना आधुनिक काळातील ॲक्शन हिरोप्रमाणे सादर करणं योग्य वाटत नाही. ट्रेलरमध्ये श्रीराम झाडावर चढून बाण सोडताना दिसतात, यावरही त्यांनी आक्षेप घेतला.
मुकेश खन्ना यांनी म्हटलं की, त्यांनी अनेकदा रामायण वाचलं आहे आणि रामलीला पाहिली आहे; मात्र अशा प्रकारे श्रीराम यांना ॲक्शन करताना यापूर्वी पाहिलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, श्रीरामांची ओळख केवळ युद्धकौशल्यापुरती मर्यादित नसून ‘मर्यादा पुरुषोत्तम’ अशी आहे. “नितेश तिवारी आणि त्यांच्या टीमने प्रभू श्रीराम यांना एक ॲक्शन मॅन, एक ॲक्शन सुपरस्टार बनवलं आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणून त्यांची प्रतिष्ठा हिरावून घेतली आहे. फक्त स्पेशल इफेक्ट्समुळे चित्रपट भव्यदिव्य होत नाही, कारण भारतीय परंपरेत राम यांना भावनिक महत्त्व आहे. श्रीराम हे धनुर्धर होते. ते देवाचं एक रुप, अवतार आहेत. पण या ट्रेलरमध्ये दाखवलेल्या लढाईच्या दृश्यांसारखी दृश्ये मी कधीही पाहिली नाहीत. मी रामायण खूप वाचलं आहे, मी रामलीला पाहिली आहे. या लोकांनी श्रीराम यांना सलमान खान, अमिताभ बच्चन आणि रजनीकांत बनवलं आहे. राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत”, असं ते म्हणाले.
पुढे त्यांनी श्रीरामांना ‘मॅन ऑफ ॲक्शन’ किंवा ‘क्लिंट ईस्टवुड’सारखं दाखवण्यात आल्याचीही टिप्पणी केली. चित्रपटातील मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेल्या स्पेशल इफेक्ट्सवरही खन्ना यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘रामायण’चा जागतिक स्तरावर विचार केला जात असला, तरी भारतात श्रीराम यांची प्रतिमा आणि धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन त्यांचं चित्रण केलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे. परदेशातील प्रेक्षक चित्रपटाची तुलना ‘स्टार वॉर्स’सारख्या भव्य सिनेमांशी करू शकतात; मात्र भारतीय प्रेक्षकांसाठी रामायणाचा विषय श्रद्धेशी जोडलेला असल्याचं त्यांनी नमूद केलं.