अचानक नाटकादरम्यान शरद पोंक्षे सर्वकाही विसरले अन्..; 40 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं असं

अभिनेते शरद पोंक्षे यांच्या 'पुरुष' या नाटकाचे प्रयोग सध्या सुरू आहेत. अशाच एका प्रयोगादरम्यान शरद पोंक्षे मंचावर आल्यानंतर पूर्णपणे 'ब्लँक' झाले. यावेळी त्यांनी प्रेक्षकांकडे थोडा वेळ मागितला. नाटकादरम्यान नेमकं काय घडलं, ते जाणून घ्या..

अचानक नाटकादरम्यान शरद पोंक्षे सर्वकाही विसरले अन्..; 40 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडलं असं
Sharad Ponkshe
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 30, 2024 | 11:21 AM

जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री-पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्रीच्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर एक मैलाचा दगड ठरलं होतं. मराठी रंगभूमीवरील ही महत्वपूर्ण कलाकृती सुमारे चाळीस वर्षांनंतर नाट्यप्रेमींना पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे. या नाटकात स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे प्रमुख भूमिकेत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान रसिकांना वेगळाच अनुभव आला. नाटक रंगात आलं असताना एका प्रवेशनंतर अभिनेते शरद पोंक्षे अचानक सर्वकाही विसरले, ब्लँक झाले आणि थांबले.

रसिकप्रेक्षकांनी नाट्यगृह गच्च भरलेलं असताना मंचावर असलेले पोंक्षे सर्वकाही विसरून गेले. ते म्हणाले, “रसिकहो.. मी पुरता ब्लँक झालोय. मला काहीच आठवत नाहीये. मला जरा वेळ द्याल का?” त्यावेळी सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि त्यांना संमती दिली. पुढे प्रयोग रद्द झाल्याचं घोषित केलं गेलं. पण प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन पोंक्षे पुन्हा मंचावर आले. 40 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं झाल्यामुळे पोंक्षेंना गहिवरून आलं होतं. पण प्रेक्षकांनी त्यांना थांबवलं आणि आतापर्यंतचा प्रयोग उत्तम झाल्याचं सांगत यापुढचे सगळे प्रयोग यशस्वी होतील अशा सदिच्छाही दिल्या. यावेळी प्रेक्षकांमध्ये नाराजी किंवा तक्रारीचा सूर जाणवला नाही. नाटकातील इतर कलाकारांनीही प्रेक्षकांचे आभार मानले.

लेखिका आणि व्हॉइस ओव्हर कलाकार श्रुती आगाशेनं हाच अनुभव सांगणारा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘कामाप्रती प्रामाणिक असणं आणि चुकल्यास प्रांजळपणे कबूल करणं यात कमीपणा नसतो, हे शिकायला मिळालं’, असं एकाने लिहिलंय. तर ‘मराठीतील कलाकारांना तोड नाही’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

शरद पोंक्षे हे ‘पुरुष’ या नाटकाचे निर्मातेसुद्धा आहेत. हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याविषयी ते म्हणाले, “ज्या असंख्य साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केली, त्यापैकीच एक अजरामर नाव म्हणजे नाटककार जयवंत दळवी. ऐशीच्या दशकातील त्यांचं गाजलेलं नाटत म्हणजे ‘पुरुष’. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘पुरुष’ हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणत आहोत. या नाटकाचे केवळ 50 प्रयोग होणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्याचे प्रयोग होणार आहेत.”