
Sharmila Tagore On Her Kids : दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. आता त्यांनी स्वतःच्या खासगी आयु्ष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. टायगर पतौडी यांच्यासोबत लग्न केल्यानंतर शर्मिला यांनी सिनेमांमध्ये काम केलं. ज्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा सामना करावा लागला. शिवाय आता मुलगा आणि अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत न राहण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला टागोर यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. सध्या त्यांनी केलेल्या वक्तव्याची तुफान चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीत शर्मिला टागोर यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. (Sharmila Tagore life style)
मुलाखतीत मुलांच्या लग्नानंतर त्यांच्यापासून लांब राहण्याच्या निर्णयाबद्दल शर्मिला टागोर यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, ‘एका काळानंतर आपण सर्वकाही करु शकत नाही अशी भीती कधी-कधी तुमच्या मनात भीती निर्माण होते. एक वेळ अशी असते जेव्हा मुलांना आई सर्व ठिकाणी लागते. पण आता मुलांचं लग्न झालं आहे. त्यांना पार्टनर आहे, मुलं आहेत.. ज्यामुळे त्याचा स्नेह बदलला आहे.
पुढे शर्मिला टागोर म्हणाल्या, ‘आई कुठे जात नाही, तिला गृहित धरलं जातं. पण या गोष्टीमुळे स्वतःला त्रास करुन घ्यायचा नाही. ही निसर्गाची प्रक्रिया आहे. कारण मी देखील तसंच केलं लग्नानंतर माझं माझ्या आई-वडिलांवर असलेलं लक्ष कमी झालं.’ असं देखील शर्मिला टागोर म्हणाल्या.
तर लग्न झाल्यानंतर सिनेमात काम करताना आलेल्या अडचणींबद्दल देखील शर्मिला टागोर यांनी सांगितलं. ‘आता आपण प्रगती करत आहोत. समाजात हळू-हळू पुढे जात आहोत. परिवर्तन होणं ही काळाची गरज आहे आणि आता परिवर्तन होत आहे. परिवर्तन आता संपूर्ण जगात होत आहे. पण पुरुषप्रधान संस्कृती आजही आहे.’
शर्मिला टागोर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. शर्मिला टागोर राहुल व्ही चित्तेला यांच्या फॅमिली ड्रामा ‘गुलमोहर’ मधून पुन्हा अभिनय करताना दिसणार आहेत. ‘गुलमोहर’मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी शर्मिला टागोर यांचा मुलगा अरुणच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘गुलमोहर’ 3 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
त्यामुळे अनेक वर्षांनंतर शर्मिला टागोर यांना चाहत्यांना पडद्यावर पहाता येणार आहे. सध्या सर्वत्र शर्मिला टागोर यांच्या बहुप्रतिक्षीत ‘गुलमोहर’ची चर्चा रंगत आहे. त्यामुळे शर्मिला टागोर यांना पुन्हा अभिनय करताना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (sharmila tagore bollywood film)