आलिया-अनन्यामुळे श्रद्धा कपूरला मिळत नाहीये काम? वडिलांनी दिलं उत्तर

अभिनेत्री श्रद्धा कपूर फार मोजकेच चित्रपट करत असल्याची तक्रार तिच्या चाहत्यांनी केली. यावर आता तिचे वडील शक्ती कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा निवडच चित्रपट का करते, यामागचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

आलिया-अनन्यामुळे श्रद्धा कपूरला मिळत नाहीये काम? वडिलांनी दिलं उत्तर
Shraddha Kapoor
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 26, 2025 | 10:02 AM

बॉलिवूड इंडस्ट्रीत सध्या स्टारकिड्स आणि नवीन कलाकारांना इतका भरणा झाला आहे, की काहींच्या नशिबात हवे तसे प्रोजेक्ट्स मिळत नाहीयेत. काही कलाकार मोजकेच चित्रपट करत आहेत. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्सच्या गर्दीत एक अशी स्टारकिडसुद्धा आहे, जिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. परंतु त्या मानाने तिला चित्रपटांचे ऑफर्स फारसे मिळत नाहीयेत. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर आहे. श्रद्धाचे वडील आणि अभिनेते शक्ती कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. श्रद्धा जाणूनबुजून निवडक चित्रपटांमध्ये काम करते, कारण ती इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त फी घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

श्रद्धा कपूरने 2010 मध्ये अमिताभ बच्चन यांच्या ‘तीन पत्ती’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने ‘आशिकी 2’, ‘एक विलेन’ आणि ‘हाफ गर्लफ्रेंड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. इथूनच ती ‘नॅशनल क्रश’ बनली. परंतु फिल्म इंडस्ट्रीत 15 वर्षे काम करूनही श्रद्धाने आतापर्यंत जवळपास 18 चित्रपटांमध्येच काम केलंय. श्रद्धाच्या पदार्पणाच्या दोन वर्षांनंतर आलियाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. तिने आतापर्यंत जवळपास 20 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर 2019 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अनन्या पांडेनं आतापर्यंत 12 चित्रपटांमध्ये काम केलंय. तिचा तेरावा चित्रपट सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘द पॉवरफुल ह्युमन्स’ या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत श्रद्धा कपूरच्या कामाबद्दल शक्ती कपूर म्हणाले, “ती खूप कमी चित्रपटांमध्ये काम करते. ती सर्वांत चांगल्या चित्रपटांची निवड करते आणि इतर अभिनेत्रींच्या तुलनेत ती अधिक मानधन घेते. आलिया भट्ट, अनन्या पांडे यांसारख्या अभिनेत्रींपेक्षा श्रद्धाची फी अधिक आहे. ती वर्षातून फक्त एक किंवा दोनच चित्रपट करणं पसंत करते.” यावेळी त्यांनी तिला काम न मिळण्याच्या अफवांना स्पष्टपणे नाकारलं. “तिला काम मिळत नाही?”, असा सवाल त्यांनी हसत केला. “ती खूप जिद्दी आहे आणि फक्त तिच्या मनाचं ऐकते. तिचे काही सिद्धांत आहेत आणि अत्यंत प्रामाणिकपणे ती त्यांनाच फॉलो करते. आम्हा दोघांचंही नातं खूप चांगलं आहे. आम्ही कधी भांडतो, तर कधी एकत्र सुट्ट्यांचा प्लॅन करतो. कधी चित्रपटांवर चर्चा करतो. मला तिचा खूप अभिमान आहे. ती खूप चांगली अभिनेत्री आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.