
गुन्हा, सत्ता आणि सुडाच्या राजकारणावर आधारित ‘मिर्झापूर’ या क्राइम-थ्रिलर या वेब सीरिजच्या दोन्ही सिझन्सनी चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. ओटीटीवर वेब सीरिज जबरदस्त हिट झाल्यानंतर आता त्यावर आधारित एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मिर्झापूर द फिल्म’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘मिर्झापूर’ या सीरिजमधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. म्हणून ‘मिर्झापूर’च्या सुरुवातीच्या एपिसोडमध्येच ज्या अभिनेत्रीला मारल्याचं दाखवण्यात आलं, त्याचं दु:ख आजही व्यक्त केलं जातं. स्वीटी गुप्ता असं या भूमिकेचं नाव आहे. हिंसा, बंदूक आणि पॉवर-प्लेदरम्यान गुड्डू-स्वीटीचा रोमान्स प्रेक्षकांना विशेष भावला होता. आता प्रीमिअरच्या आठ वर्षांनंतर स्वीटीची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्रिया पिळगांवकरचा जबरदस्त कमबॅक होणार आहे.
खुद्द श्रियाने याबद्दलची माहिती दिली आहे. श्रिया पिळगांवकरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ‘मिर्झापूर द फिल्म’च्या सेटवरील हा फोटो आहे. ‘मृत्यूनंतर वापसी’ असं कॅप्शन देत तिने तिच्या कमबॅकची मोठी हिंट दिली आहे. श्रियाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये एक क्लॅपबोर्ड दिसत असून त्यावर ‘मिर्झापूर द फिल्म’ असं लिहिलं आहे. ‘8 वर्षांनंतर.. अंदाज लावा कोण मृत्यूनंतर परत आलं आहे. मिर्झापूर- फिल्मचं सध्या शूटिंग सुरू आहे. लवकरच भेटुयात’, असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय. इतकंच नव्हे तर श्रियाने कास्ट आणि क्रू मेंबर्ससोबतही एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.
श्रिया पिळगांवकरने ‘मिर्झापूर’च्या पहिल्या सिझनमध्ये स्वीटी गुप्ताची भूमिका साकारली होती. गुड्डू पंडितचं तिच्यावर प्रेम असतं आणि नंतर दोघं लग्न करतात. सीरिजमध्ये स्वीटीचा अंत फार वाईट होतो. मुन्ना त्रिपाठी तिला गोळी झाडून मारतो. कथेतील हा एक असा ट्विस्ट होता, ज्यामुळे सीरिजची दिशा कायमची बदलली. मृत्यूच्या वेळी स्वीटी गरोदर असते. तिच्या मृत्यूनंतर गुड्डू आणि मुन्ना यांच्यातील वैर सुरू होतं. पहिल्या सिझनमध्ये जरी स्वीटीचा मृत्यू दाखवण्यात आला असला तरी दुसऱ्या सिझनमध्ये ती फ्लॅशबॅक आणि स्वप्नांमधून पुन्हा प्रेक्षकांच्या समोर आली.
‘मिर्झापूर द फिल्म’ची पहिली घोषणा 2024 मध्ये झाली होती. यामध्ये अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू यांसारखे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गुरमीत सिंह या चित्रपटाचे दिग्दर्शक असून पुनित कृष्णा त्याची निर्मिती करत आहेत.