निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान सिमी गरेवालने पोस्ट केला तो व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चनचं नाव अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. अभिषेकने निम्रतसाठी ऐश्वर्याची फसवणूक केली, असा आरोप सोशल मीडियाद्वारे होतोय.

निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांदरम्यान सिमी गरेवालने पोस्ट केला तो व्हिडीओ
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 05, 2024 | 10:48 AM

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या संसारात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. ऐश्वर्याने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. मात्र या वाढदिवशी पती अभिषेक किंवा बच्चन कुटुंबीयांकडून कोणतीच पोस्ट लिहिण्यात आली नव्हती. यामुळे पुन्हा एकदा दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. यावर अद्याप ऐश्वर्या किंवा अभिषेककडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र आता अभिनेत्री आणि दिग्दर्शिका सिमी गरेवाल यांनी अभिषेकच्या समर्थनात एक पोस्ट लिहिली आहे. अभिषेकला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जातंय. या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर सिमी यांनी ही पोस्ट लिहिल्याचं म्हटलं जातंय.

अभिषेकने सिमी गरेवाल यांच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. याच मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत सिमी यांनी लिहिलं, ‘माझ्या मते जे लोक अभिषेकला जवळून ओळखतात ते माझ्या या मताशी सहमत असतील की तो बॉलिवूडमधील सर्वांत चांगला माणूस आहे. त्याच्यात चांगली मूल्ये आणि जन्मजात शालीनता आहे.’

सिमी यांनी शेअर केलेल्या मुलाखतीच्या क्लिपमध्ये अभिषेक नात्यातील फसवणुकीबद्दल आपलं मत मांडताना दिसतोय. तो म्हणतोय, “मला तुम्ही जुन्या विचारांचा माणूस असं म्हटलं तरी चालेल पण उथळ स्वभावाच्या लोकांविरोधात माझ्या मनात काहीच नकारात्मक नाही. ज्या लोकांना मजा करायला आवडते, त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही. जर दोघांची हीच इच्छा असेल तर बिनधास्तपणे जगा. सर्व प्रकारे जगण्याचा आनंद घ्या. पण जर तुम्ही एखाद्याला वचन दिलं असेल, मग ते कोणत्याही बाबतीत असो.. त्याच्याशी तुम्ही बांधिल राहा. अन्यथा तुम्ही वचन देऊ नका. माझं हे वैयक्तिक मत आहे की एक पुरुष म्हणून तुम्ही एका महिलेला वचन देत असाल, मग जरी तुम्ही तिचा बॉयफ्रेंड असलात तरी तिच्याशी प्रामाणिक राहा. कारण जर ती तुमच्याशी प्रामाणिक राहिली नाही, तर ते तुम्हालाही आवडणार नाही. पुरुषांवर आधीच प्रामाणिक नसल्याचा आरोप केला जातो. मला ही गोष्ट कधीच समजली नाही आणि त्याच्याशी मी सहमत नाही. मला त्या गोष्टीची चिड येते.”

सिमी गरेवाल यांची ही पोस्ट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडीओवर दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान म्हणाली, “मी पूर्णपणे सहमत आहे, तो सर्वांत चांगला माणूस आहे.” मात्र या पोस्टवरील इतर कमेंट्स आणि नकारात्मकता पाहून सिमीने नंतर तो व्हिडीओ डिलीट केला.