23 वर्षांच्या लिव्ह-इननंतर लग्न करणाऱ्या मराठी अभिनेत्रीसाठी स्मृती ईराणींची पोस्ट; म्हणाल्या ‘काळानुसार प्रेम..’

मराठमोळी अभिनेत्री अश्लेषा सावंतने 23 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या अभिनेत्याशी अखेर लग्न केलं आहे. या लग्नावर आता स्मृती ईराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अश्लेषा आणि संदीप एकाच मालिकेत काम करत होते.

23 वर्षांच्या लिव्ह-इननंतर लग्न करणाऱ्या मराठी अभिनेत्रीसाठी स्मृती ईराणींची पोस्ट; म्हणाल्या काळानुसार प्रेम..
स्मृती ईराणी, अश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना
Image Credit source: Instagram
Updated on: Nov 25, 2025 | 1:32 PM

तब्बल 23 वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अश्लेषा सावंतने सहकलाकार आणि लिव्ह-इन पार्टनर संदीप बसवानाशी लग्न केलं. वृंदावनमधल्या एका मंदिरात मोजक्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी लग्नगाठ बांधली. अश्लेषा आणि संदीप यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहु थी’ या लोकप्रिय मालिकेत दीर आणि वहिनीची भूमिका साकारली होती. याच मालिकेत मुख्य भूमिका साकारलेल्या स्मृती ईराणी यांनी या दोघांसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. अश्लेषा आणि संदीप यांची जोडी आणि त्यांच्या प्रेमाची संकल्पना इतरांपेक्षा कशी वेगळी होती, हे त्यांच्या या पोस्टमधून समजतं.

स्मृती ईराणी यांची पोस्ट-

‘काही प्रेमकथा सर्वांत रंजक वळणं घेतात. त्या कर्मकांडांनी नव्हे तर वास्तववादाने सुरू होतात. ते एकमेकांना सहवासाचं आश्वासन देतात. काळानुसार प्रेम कमी होऊ शकतं, पण मैत्री कमी होत नाही, हे प्रामाणिक सत्य ते इतरांसमोर मांडतात आणि त्या सत्यापासून एक सुंदर, थोडा वेगळा प्रवास सुरू होतो. अश्लेषा आणि संदीप कायम असेच राहिले: वेगळे, अपारंपरिक आणि स्वत: जसे आहेत तसेच. प्रेमात वेडे, एकमेकांशी सुसंगत राहिलेल्या या दोघांनी माझ्यासारख्या मित्रमैत्रिणींना खूप त्रास दिला, जे सतत त्यांना लग्न करायला सांगत होते. अखेर माझ्यासारख्या मूर्खांना त्यांचा मार्ग सापडला असं दिसतंय. त्यांना आता प्रेमाच्या बंधनात आणि विधींद्वारे हे बंधन साजरं करताना पाहून खूप आनंद होतोय’, असं त्यांनी लिहिलंय.

16 नोव्हेंबर रोजी वृंदावनमधल्या चंद्रोदय मंदिरात अश्लेषा आणि संदीप यांनी छोटेखानी लग्न केलं. “या लग्नामुळे आमचे आईवडील फार खुश आहेत. बऱ्याच काळापासून ते या क्षणाची प्रतीक्षा करत होते. आम्हाला हे लग्न अत्यंत साधेपणाने करायचं होतं आणि भगवान कृष्ण यांच्या मंदिरात लग्न करण्यापेक्षा उत्तम आणखी काय असू शकतं?”, अशी प्रतिक्रिया संदीपने या लग्नानंतर दिली. अश्लेषा 41 वर्षांची असून संदीप तिच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठा आहे. अश्लेषा सध्या ‘झनक’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तर संदीपने ‘अपोलीना’ या मालिकेत काम केलं होतं. 2002 मध्ये ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.