
Son Of Sardaar 2 Review: अभिनेता अजय देवगण स्टारर ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा अखेर चाहत्यांच्या भेटीस आला आहे. 13 वर्षांनंतर अभिनेता चाहत्यांचा पोट धरुन हसवण्यास तयार झाला आहे. ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाचा पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. ‘सन ऑफ सरदार’ एक क्लिन कॉमेडी सिनेमा होता. ज्याने प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता पुन्हा एकदा अजय देवगण जस्सीच्या भूमिकेत चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आला आहे. जी जादू ‘सन ऑफ सरदार’ने चाहत्यांच्या मनावर केली, ज्याप्रकारे चाहत्यांना हसवलं? तेच ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा करु शकेल का? हे येत्या काही दिवसांमध्ये कळेल. सिनेमात अजय देवगन, मृणाल ठाकुर आणि विजय कुमार अरोरा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे… आता सिनेमाबद्दल अधिक माहिती घेऊ…
सिनेमाच्या कथेची सुरुवात होते जस्सी (अजय देवगण) याच्या लग्नापासून…. पण त्याची पत्नी (नीरू बाजवा) हिला घटस्फोट हवा असतो… पत्नीने केलेल्या फसवणुकीनंतर अजय लंडनमध्ये सर्वत्र फिरत असताना त्याची ओळख पकिस्तानी रबिया (मृणाल ठाकूर) हिच्यासोबत होते. रबिया तिची मुलगी आणि कुटुंबासोबत लंडन येथे राहते. रबिया हिची मुलगी संधू कुटुंबातील मुलाच्या प्रेमात पडते. पण देशभक्त संधू कुटुंब पाकिस्तानी लोकांचा द्वेष करतात. अशा परिस्थितीत, राबियाला मदत करण्यासाठी, जस्सी तिच्या पाकिस्तानी मुलीचा सरदार वडील असल्याचं भासवतो. सिनेमात पुढे अनेक ट्विस्ट येतात. आता सिनेमात पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी, तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा पहावा लागेल.
सांगायचं झालं तर, सिनेमा प्रचंड मजेदार आहे. पण सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला पंजाबची आठवण येईल आणि असं झालं देखील पाहिजे… दिग्दर्शक, विजय कुमार अरोरा यांनी सिनेमाला पूर्णपणे पंजाबी ट्रीटमेट दिली आहे. जर तुम्ही सामान्य प्रेक्षक असाल आणि सर्व काही विसरून तुम्हाला फक्त हसायचं आहे… तर ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे… प्रत्येक सीन तुच्यासाठी मजेदार असेल आणि आनंदाने तुम्ही वाह… वाह देखील कराल …
पण जर का तुम्ही अशा दर्शकांपैकी एक आहात, जे प्रत्येक सीन बारकाईने पाहत आहात आणि जज करत आहात, तर हा सिनेमा तुम्हाला आवडणार नाही… कारण अनेक ठिकाणी असे विनोद आहे, ज्यावर तुम्हाला हसू येणारच नाही… उलट तुम्ही म्हणाल, ‘हे काय आहे?’, जर तुम्हाला पीजे आवडत नसतील तर, सिनेमातील काही विनोद इतके वाईट आहेत की, तुम्ही डोक्यावर हात माराल आणि म्हणाल, ‘हे काय आहे?’ पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा तुम्हाला कुठेच बोर करणार नाही…
दिग्दर्शक म्हणून विजय कुमार अरोरा यांचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. त्यांचा पंजाबी सिनेमा ‘हरजीता’ ला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. पण ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा ‘हरजीता’ सिनेमापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. एकीकडे ‘रेड’, दृश्यम’, ‘मेट्रो इन दिनो’ यांसारख्या सिनेमांसोबत हिंदी सिनेमा पुढे वाटचाल करत आहे. तर ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमा विनोदासाठी जुने विचार पुढे मांडताना दिसत आहे. 4 लग्न करणाऱ्या वडिलांना कूल दाखवणं किंवा फसवणुकीला विनोदाचा विषय बनवणं अनेकांना खटकलं आहे. प्रेक्षक आता अशा विनोदांना कंटाळले आहेत. जेव्हा ओटीटी आणि थिएटरमध्ये उत्कृष्ट आणि स्मार्ट कॉमेडी सिनेमे प्रदर्शित होत आहेत, तेव्हा असा सिनेमा थोडा निराशाजनक आहे.
‘सन ऑफ सरदार 2’ च्या तुलनेत ‘सन ऑफ सरदार’ सिनेमाची स्क्रिप्ट उत्तम होती. ‘सन ऑफ सरदार 2’ सिनेमात जस्सी म्हणजे अजय देवगण याला अनेक ठीकाणी भावूक होताना दाखवण्यात आलं आहे. जे अभिनेत्याला बिलकूल सूट करत नाही. कॅमेऱ्यावर उत्तम काम करणाऱ्या ‘डड्डू’ कडून जास्त अपेक्षा होत्या.
सिनेमाचं दिग्दर्शन निराशाजनक आहे. पण संपूर्ण सिनेमाचा भार अजयने एकट्याने स्वतःच्या खांद्यावर उचलला. त्याचं कॉमिक टायमिंग आणि उत्तम अभिनय तुम्हाला हसवतो. अभिनेत्याने सिनेमात जीवंतपणा आणला आहे. मृणाल ठाकूर हिने देखील उत्तम अभिनय केला आहे. पहिल्यांदा मृणार बोल्ड आणि बिनधास्त भूमिका निभावली आहे. रवी किशन यांच्याबद्दल काही बोलायलाच नको… अभिनयाने त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. तर मुकुल देव आणि विंदू दारा सिंग यांच्या जोडीने देखील कमाल केली आहे. त्यांची कॉमेडी आणि टायमिंग इतकी मजेदार आहे की प्रेक्षक स्वतःचं हसू थांबवू शकणार नाहीत. पण मुकुल देव सारख्या प्रतिभावान कलाकाराला आपण आता पडद्यावर पाहू शकणार नाही, हे विचार करूनही आपल्या डोळ्यात पाणी येतं.
जर तुम्ही अशी व्यक्ती आहात जिला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून फक्त हसायचं आहे, तर तुमच्यासाठी हा सिनेमा उत्तम पर्याय आहे. सिनेमा पाहताना तुम्हाला अधिक विचार करण्याची काहीही गरज नाही. फक्त सिनेमागृहात जा आणि सिनेमाचा आनंद घ्या… सिनेमा एक ‘नो-ब्रेनर’ कॉमेडी आहे. पण, जर तुम्ही अशा विनोदी सिनेमाच्या शोधत असाल ज्यामध्ये नवीन कल्पना, चांगली पटकथा आणि काही संदेश देण्यासोबतच मजबूत दिग्दर्शन असेल, तर हा सिनेमा कदाचित तुमच्यासाठी नाही. त्यातील काही दृश्ये आणि विनोद तुम्हाला निराश करू शकतात. सांगायचं झालं तर, ‘सन ऑफ सरदार 2’ अशा लोकांसाठी आहे, ज्यांना दोन तास फक्त हसायचं आहे. सिनेमात अधिक विचार करण्याची काहीही गरज नाही.
‘सन ऑफ सरदार 2’ मध्ये, अजय देवगण पुन्हा एकदा जस्सी रंधावाच्या भूमिकेत त्याच्या देसी अंदाज पडद्यावर उपस्थितीसह परतला आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर राबियाच्या भूमिकेत दिसली होती. डिंपलच्या भूमिकेत नीरू बाजवा दमदार दिसत होती आणि राजाच्या भूमिकेत रवी किशन दमदार दिसत होते.
सिनेमाच्या सपोर्टिंग स्टारकास्ट मध्ये दीपक डोबरियाल (गुल), चंकी पांडे (दानिश), कुब्रा सैत (महविश), संजय मिश्रा (बंटू पांडे), अश्विनी कालसेकर (प्रेमलता), डॉली अहलूवालिया (बेबे), मुकुल देव (टोनी), विंदू दारा सिंग (टीटू), साहिल मेहता (गोग्गी), रोशनी वालिया (सबा) आणि शरत सक्सेना (रंजीत सिंग) सामिल आहेत.