Border 2 Sonu Nigam : ‘बॉर्डर 2’वरुन वाद, जावेद अख्तर यांना ही गोष्ट नाही पटली, सोनू निगमने दिलं उत्तर
"बॉर्डर एक अशी फ्रेंचायजी आहे, जी काल्पनिक नाही, तर खऱ्या गोष्टी सांगते. ही आपल्या देशाची, आपल्या सैनिकांची आणि त्यांच्या विजयाची गोष्ट आहे" असं सोनू निगम म्हणाला

बॉर्डर 2 थिएटरमध्ये रिलीज होण्याआधी या चित्रपटातील एक गाणं खूप चर्चेत होतं. या गाण्याने एका अख्ख्या पिढीच्या जुन्या दिवसाच्या आठवणी ताज्या केल्या. हे गाणं दुसरं-तिसरं कुठलं नसून ‘संदेसे आते हैं’ आहे. या गाण्याने हिंदी सिनेसृष्टीत नॉस्टेल्जिया वर्सेस ओरिजिनॅलिटी वाद सुरु झालाय. या वादात गीतकार जावेद अख्तर आणि ओरिजनल गाण्याचा गायक सोनू निगम यांच्या Reactions सुद्धा आहेत. सोनू निगमने 1997 साली संदेसे आते हैं गाण्याला आवाज दिला होता. त्याने सीक्वल सॉन्ग ‘घर कब आओगे’ सुद्धा गायलं आहे. या नव्या गाण्यात मनोज मुंतशिरने लिहिलेले नवीन शब्द आहेत. साऊंडट्रॅकमध्ये अरिजीत सिंह, दिलजीत दोसांझ आणि विशाल सिंह यांचा सुद्धा आवाज आहे.
चित्रपटाच्या रिलीजआधी सोनू निगमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ मेसेज शेअर केला. त्यात त्याने ‘बॉर्डर 2’ ला राष्ट्राला समर्पित केलं. फ्रेंचायजीसोबतच्या दीर्घ नात्याचा विचार मांडला.” मी 1997 साली पहिल्या बॉर्डरसाठी हे गाणं गायलं होतं. आता 2026 साली मी बॉर्डर 2 च्या प्रीमिअरला उभा आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की, हा इतका सुंदर प्रवास इतकी वर्ष चालू राहीलं. त्याने प्रेक्षकांकडून सतत मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आभार मानले” असं सोनू म्हणाला.
ते युद्ध आपण पुन्हा जिंकणार
सोनू निगम पुढे बोलला की, “निर्मात्यांनी संगीतावर विशेष जास्त लक्ष दिलय. वास्तवात जे युद्ध आपण काही वर्षांपूर्वी जिंकलो होतो, ते आपण बॉर्डर 2 च्या माध्यमातून पुन्हा जिंकणार आहोत”
जावेद अख्तर यांनी का नकार दिलेला?
जावेद अख्तर यांनी क्लासिक ट्रॅक्स पुन्हा बनवण्याच्या ट्रेंडवर टीका केली होती. त्यानंतर ‘संदेसे आते हैं’ गाण्यावरील वादविवाद आणखी वाढला. जावेद अख्तर यांनी ‘बौद्धिक रचनात्मक दिवाळखोरी’ म्हटलं होतं. जावेद अख्तर यांनी खुलासा केला की, सीक्वलासाठी ‘संदेसे आते हैं’ गाण्याची नव्याने शब्दरचना करायला नकार दिला होता.
सोनू निगमने काय म्हटलं?
जावेद अख्तर यांच्या टिप्पणीवर मत मांडताना सोनू निगमने सर्वप्रथम त्यांच्याबद्दल सन्मान व्यक्त केला. त्यानंतर आपला मुद्दा मांडला. “हो, जावेद सर एकदम बरोबर बोलतायत. जुनी गाणी पुन्हा आणणं चांगलं नाही. पण बॉर्डर एक सैनिक आहे. संदेसे आते हैं त्याचा गणवेश आहे. बॉर्डर चित्रपटाचा आपण या गाण्याशिवाय विचार करु शकत नाही” जावेद अख्तर मिट्टी के बेटे नामक ‘बॉर्डर 2’ च्या नव्या गाण्याचं कौतुक करतील. हे गाणं सैनिक आणि राष्ट्राला समर्पित एक श्रद्धांजली आहे.
