
काही दिवसांपूर्वी अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदच्या कारचा नागपुरात अपघात झाला होता. या अपघातात सोनाली आणि इतर दोन नातेवाईक जखमी झाले होते. आता सोनू सूदने यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे. कार चालवताना प्रत्येक प्रवाशाने सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे, असं त्याने म्हटलंय. प्रवासादरम्यान कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावले होते, म्हणूनच त्यांचे प्राण वाचले, असंही त्याने सांगितलं. त्यामुळे फक्त कारचालक किंवा त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवाशानेच नाही तर मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीट बेल्ट लावा, असं आवाहन सोनू सूदने केलं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनू म्हणतो, “गेल्या आठवड्यात नागपुरात एक मोठा अपघात झाला होता. माझी पत्नी, तिची बहीण आणि भाचा हे तिघं कारमध्ये होते आणि त्या कारचा अपघात झाला. त्यानंतर त्या कारची अवस्था काय झाली, हे संपूर्ण जगाने पाहिलं. जर त्यांना एखाद्या गोष्टीने वाचवलं असेल, तर ते म्हणजे सीट बेल्ट. गाडीमध्ये मागे बसलेले प्रवासी सहसा सीट बेल्ट लावत नाहीत. अपघाताच्या दिवशी सुनिता (सोनालीची बहीण) मागच्या सीटवर बसली होती आणि माझी पत्नी सोनालीने तिला लगेचच सीट बेल्ट लावायला सांगितलं होतं. तिने सीट बेल्ट लावल्याच्या मिनिटभरातच अपघात झाला होता. गाडीतील तिघेही प्रवासी सुरक्षित होते, कारण तिघांनीही सीट बेल्ट लावला होता.”
“100 पैकी 99 टक्के मागच्या सीटवर बसणारे प्रवासी सीट बेल्ट लावत नाहीत. फक्त पुढच्या सीटवर बसलेल्यांचीच ही जबाबदारी असते, असं अनेकांना वाटतं. मी सर्वांना विनंती करतो की सीट बेल्ट लावल्याशिवाय कारमध्ये बसू नका. अनेक ड्राइव्हर्स फक्त पोलिसांना दाखवायला सीट बेल्ट लावतात. तेव्हा ते सीट बेल्ट व्यवस्थित लावलेलंही नसतं. पण माझ्यावर विश्वास ठेवा, सीट बेल्टमुळे तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय सुरक्षित राहतील”, असं आवाहन सोनू सूदने केलंय.
“सीट बेल्ट नाही तर तुमचा परिवार नाही”, असा संदेश त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. सोनू सूदची पत्नी सोनालीचा अपघात 25 मार्च रोजी नागपुरात झाला होता. दोन जणांसोबत सोनाली नागपूर एअरपोर्टवरून बैरामजी टाऊनला जात होती. सोनेगावजवळील वर्धा रोड वायडक्ट ब्रिजवर सोनालीच्या कारने एका ट्रकला मागून धडक दिली होती. या अपघातानंतर तिघांना नागपुरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर 29 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला होता.