
साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत असणारा ‘वाराणसी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा भव्य टीझर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टीझर लॉन्च दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने राजामौलींनी भगवान हनुमानावर टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीसोबतच 2011 मधील एक जुने ट्विटही व्हायरल होत आहे. इव्हेंटमध्ये वारंवार तांत्रिक समस्या आल्यानंतर राजामौलींनी सर्वप्रथम माफी मागितली आणि एक वैयक्तिक किस्सा सांगितला.
नेमकं प्रकरण काय?
एसएस राजामौलींनी आपले वडील आणि लेखक विजयेंद्र प्रसाद यांचा उल्लेख करत तेलुगूमध्ये सांगितला. “मला देवावर फारसा विश्वास नाही. माझे वडील आधी येऊन म्हणाले की हनुमान माझ्या पाठीशई उभे आहेत आणि मला मार्गदर्शन करत आहेत. हे ऐकताच मला राग आला. हे काय त्यांचे मार्गदर्शन आहे का?” असे ते म्हणाले. राजामौलींची ही टिप्पणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. अनेकांनी हा भगवान हनुमानाचा अपमान आहे असे देखील म्हटले.
हे सगळं सुरु असतानाच एसएस राजामौलींचे २०११ मधील एक जुने ट्विट पुन्हा ट्रेंड करू लागला आहे. ट्विटमध्ये लिहिले होते की त्यांना भगवान राम कधीच आवडले नाहीत आणि त्यांना भगवान कृष्ण सर्वात जास्त आवडतात. टीकाकारांनी ट्विटचे स्क्रीनशॉट शेअर करत एक पॅटर्न असल्याचा दावा केला, तर काहींनी सांगितले की राजामौलींनी नंतर त्या विधानाचा संदर्भ स्पष्ट केला होता.
राष्ट्रीय वानर सेनेने एसएस राजामौलींविरुद्ध तक्रार दाखल केली
एसएस राजामौलींनी त्या पोस्टमध्ये पुढे लिहिले होते, “पण मला भगवान राम कधीच आवडले नाहीत. भगवान कृष्ण हे माझ्या सर्व अवतारांमध्ये आवडतात.” तसेच टीझर लाँच कार्यक्रमात राजामौली यांनी भगवान हनुमानावर केलेल्या टिप्पणीने राष्ट्रीय वानर सेनेने हैदराबादच्या सरूरनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. एसएस राजामौलींवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर एसएस राजामौलींच्या पुढील प्रकल्पाच्या बहिष्काराची मागणी करणारा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.