देवाबद्दल असं काय म्हणाले राजामौली? जे ऐकून भडकले नेटकरी

'बाहुबली', 'RRR' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात देवाबद्दल असं काही म्हणाले, जे ऐकून काही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राजामौलींकडून अशी अपेक्षा नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

देवाबद्दल असं काय म्हणाले राजामौली? जे ऐकून भडकले नेटकरी
एस. एस. राजामौली
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 17, 2025 | 10:10 AM

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक एस. एस. राजामौली हे पौराणिक विषयांना अधोरेखित रखत चित्रपट बनवत असले, त्यांच्या चित्रपटात महादेव, श्रीराम यांचे संदर्भ दिसले तरी ते स्वत: देवावर विश्वास ठेवत नाही. याआधी विविध मुलाखतींमध्ये त्यांनी याचा खुलासा केला होता. आता त्यांचा आगामी ‘वाराणसी’ या चित्रपट जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा ही गोष्ट चर्चेत आली आहे. नुकताच हैदराबादमध्ये ‘वाराणसी’ या चित्रपटाचा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राजामौली पुन्हा एकदा म्हणाले की ते देवावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या या वक्तव्यावरून काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘वाराणसी’च्या कार्यक्रमादरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यावर प्रेक्षकांना संबोधित करताना राजामौली भावूक झाले. ते म्हणाले, “मी देवावर विश्वास ठेवत नाही. माझ्या वडिलांनी सांगितलं की देव हनुमान सर्व गोष्टी सांभाळून घेतील. मला विचार करून खूप राग आला की अशा पद्धतीने गोष्टी सांभाळत आहेत का? माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती अशा प्रकारे वागते, जणू ते तिचे मित्रच आहेत आणि ती त्यांच्याशी संवाद साधते. मला तिच्यावरही राग आला. जेव्हा माझ्या वडिलांनी हनुमानाविषयी सांगितलं आणि यशासाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याचा सल्ला दिला, तेव्हाही मला खूप राग आला.”

राजामौलींची ही क्लिप व्हायरल होत असून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. देवावर विश्वास नसल्याचं म्हणणाऱ्या राजामौलींवर काहींनी रागसुद्धा व्यक्त केला आहे. ‘जर तुम्हाला देवावर विश्वास नसेल, तर तुम्ही चित्रपटाचं नाव वाराणसी असं का ठेवलात? त्यात पौराणिक पात्रांवर आधारित भूमिका का दाखवल्या आहेत? त्यांच्याकडून अशा गोष्टीची अपेक्षा नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘त्यांना हे माहीत नाही का की लोकांच्या भावना दुखावू शकतात’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

राजामौली यांना रामायण, महाभारत यांसारख्या महाकाव्यांमध्ये प्रचंड रुची आहे. “लहानपणापासूनच मी अनेकदा रामायण आणि महाभारत यांचं माझ्यासाठी काय महत्त्व आहे आणि त्यासंदर्भात माझी काय स्वप्नं आहे, याबद्दल बोलत आलोय. रामायणातील एका महत्त्वाच्या भागाचं इतक्या लवकर चित्रीकरण करण्याची संधी मला मिळेल असं मी कधीच स्वप्नात पाहिलं नव्हतं. यातील प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक संवाद लिहिताना मला असं वाटत होतं की मी एका वेगळ्यात विश्वात आहे”, अशा शब्दांत राजामौली व्यक्त झाले.