
Archana Puran Singh : गेल्या अनेक दिवसांपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत असलेला कपिल शर्माचा लोकप्रिय शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. या शोचे अनेक भाग प्रदर्शित झाले असून प्रत्येक भागात विनोद, चेष्टा आणि सेलिब्रिटी पाहुण्यांची धमाल पाहायला मिळते. या शोमध्ये नेहमीप्रमाणे जजच्या खुर्चीवर झळकणाऱ्या अर्चना पूरण सिंग या केवळ शोपुरत्याच मर्यादित नसून त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील ‘बिहाइंड द सीन’ व्हिडीओमुळेही त्या प्रचंड चर्चेत असतात.
अर्चना पूरण सिंग यांनी नुकतेच त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शोच्या शूटिंगचा पहिला दिवस सेटवरील मजेशीर क्षण आणि कलाकारांमधील गमतीशीर संवाद दाखवण्यात आला आहे. मात्र, या सगळ्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अर्चना यांच्या हातातील मोठ्या डायमंड रिंगने.
‘तुम्ही खूपच श्रीमंत आहात’
व्हिडीओची सुरुवात अर्चना यांच्या घरापासून होते. त्यांचा पती परमीत सेठी आणि दोन्ही मुलं आज काहीतरी खास असल्याचं पाहून त्यांना विचारतात. त्यावर अर्चना सांगतात की आज ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या शूटिंगचा पहिला दिवस आहे. यानंतर त्या फिल्म सिटीकडे रवाना होतात.
फिल्म सिटीत पोहोचल्यानंतर अर्चना आपल्या वॅनिटी व्हॅनमध्ये तयार होताना दिसत आहेत. त्यानंतर त्या आधी कीकू शारदा आणि मग कृष्णा अभिषेक यांना भेटायला जातात. याच दरम्यान कृष्णाची नजर अर्चना यांच्या हातातील डायमंड रिंगवर पडते. ती पाहून तो थक्क होतो आणि मजेशीर अंदाजात म्हणतो की, ‘तुम्ही खूपच श्रीमंत आहात.’ कृष्णाची ही प्रतिक्रिया पाहून तेथील सर्वजण हसतात.
‘अंगठीच्या किमतीत मुंबईत 7 बेडरूमचा फ्लॅट’
यानंतर अर्चना सेटवर जातात जिथे कपिल शर्मा, महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू आणि इतर कलाकारांसोबत भरपूर मस्ती-मजाक सुरू असतो. पुढे अर्चना सुनील ग्रोवर यांच्या वॅनिटी व्हॅनमध्ये जातात. तिथे सुनील लगेच त्या अंगठीकडे लक्ष वेधत म्हणतो की, ‘या अंगठीच्या किमतीत मुंबईत 7 बेडरूमचा फ्लॅट येईल.’ सुनीलचा हा डायलॉग ऐकून सर्वजण पुन्हा एकदा हसतात.
याच गप्पांमध्ये सुनील अर्चना यांना विचारतो की शोमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या सततच्या टोमण्यांमुळे किंवा विनोदांमुळे त्या कधी नाराज होत नाहीत ना? यावर अर्चना अगदी स्पष्टपणे सांगतात की, ‘अजिबात नाही.’ त्यावर सुनील हसत म्हणतो, ‘बस, हेच ऐकायचं होतं.’