फूड के रंग उड गये..; सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर भन्नाट कविता, VIDEO पाहून महाराष्ट्रात एकच चर्चा

तुकाराम मुंढे यांच्या कामाची चर्चा याआधीही अनेकदा झाली आहे. मात्र, आता मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय कलाकार सुनील ग्रोव्हरने आपल्या विनोदी कवितेतून त्यांचा उल्लेख केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

फूड के रंग उड गये..; सुनील ग्रोव्हरची तुकाराम मुंढेंवर भन्नाट कविता, VIDEO पाहून महाराष्ट्रात एकच चर्चा
Sunil Grover and Tukaram Mundhe
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 10, 2026 | 12:08 PM

महाराष्ट्रातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची चर्चा आता थेट बॉलिवूडपर्यंत पोहोचली आहे. आपल्या कडक शिस्तीमुळे आणि भ्रष्टाचार तसंच भेसळखोरांविरोधातील कारवायांमुळे कायम चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांचं कौतुक आता प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदवीर सुनील ग्रोव्हरनेही केलं आहे. नेटफ्लिक्सवरील ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सुनील ग्रोव्हरने तुकाराम मुंढे यांच्यावर खास कविता सादर केली. त्याच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्याला चांगलीच पसंती दिली आहे.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या ‘यारों की महफिल’ या विशेष भागात अभिनेता पंकज त्रिपाठी पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. पंकज त्रिपाठी यांनी ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली होती. याच पार्श्वभूमीवर शोमध्ये सुनील ग्रोव्हरने ‘सरल बिहारी वाजपेयी’ हे अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून प्रेरित पात्र साकारत मंचावर एंट्री केली. त्याचा हा अंदाज पाहून उपस्थित प्रेक्षक आश्चर्यचकित झाले. यानंतर सुनीलने आपल्या खास शैलीत एक कविता सादर केली. विशेष म्हणजे, या कवितेत त्याने थेट महाराष्ट्राचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांचा उल्लेख केला.

Loading...

पहा व्हिडिओ

सुनील ग्रोव्हरने सादर केलेल्या कवितेच्या ओळी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. ‘फूड के रंग उड गये, अब लाल मंच्युरिअन पिले पड गये… बुढ्ढी के जो बाल गुलाबी थे, वो फिरसे सफेद हो गये… फिरसे ग्रीन हो गये टिंडे, बॅन हो गये हैं फर्जी अंडे, जबसे आये हैं तुकाराम मुंढे…’ अशा मजेशीर शब्दांत त्याने मुंढे यांच्या कारवाईचा उल्लेख केला. कवितेतील या ओळी ऐकताच शोमध्ये उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कपिल शर्मा आणि इतर कलाकारांनीही सुनीलच्या सादरीकरणाचा आनंद घेतला. खाद्यपदार्थांमधील भेसळीवर विनोदी शैलीत भाष्य करत त्याने तुकाराम मुंढे यांच्या कामाची दखल घेतली.

तुकाराम मुंढे हे सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, कृत्रिम रंग, बनावट तूप आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात त्यांनी कठोर कारवाई केली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून धडक तपासणी मोहीम राबवण्यात आली. मंच्युरियनमधील कृत्रिम रंग, गुलाबी रंगाची कापूसगोडी म्हणजेच ‘बुढ्ढी के बाल’ आणि बनावट अंड्यांसारख्या प्रकारांवरही या कवितेतून भाष्य करण्यात आलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us