‘गटर शो बंद करा..’ Bigg Boss वरून सुनील पालची सलमानवर टीका, थेट भाईजानशी पंगा
कॉमेडिअन सुनील पाल गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असून आता त्यांनी अभिनेता सलमान खान आणि तो होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस' या रिॲलिटी शोवर कडाडून टीका केली आहे. हा शो बंद करण्यात यावा अशी मागणीच त्यांनी केली. नेमकं काय घडलं ?

विख्यात कॉमेडिअन सुनील पाल (Sunil Pal) हे सध्या प्रोफेनल आयुष्यामुळे नव्हे तर वैयक्तिक आयुष्यातील विधानांमुळे चर्चेत आहेत. ते नेहमीच त्यांच्या बेधडक शैलीत वक्तव्य करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी प्रसिद्ध क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ आणि अमिताभ बच्चन यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर आता सुनील पाल यांनी अभिनेता सलमान खान (Salman Khan)आणि तो जो रिॲलिटी शो होस्ट करतो, त्या ‘बिग बॉस’वर (Bigg Boss) जोरदार टीका केली आहे. या शोमधील कंटेंट आणि त्या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक यांच्यावर प्रश्न उपस्थित करत हा ‘गटर शो’ असल्याचं मोठं विधान सुनील पाल यांनी केलं आहे. एवढंच नव्हे तर, लोकांना सल्ले देत असतील, तर आधी त्यांनी आपल्या शोच्या कंटेंटकडे लक्ष द्यावे, असंही सुनील पाल यांनी सलमान खानला सुनावलं.
सलमान खानवर साधला निशाणा
मीडियाशी संवाद साधताना सुनीला पाल यांनी सलमानने अलीकडे केलेल्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया दिली. ‘बिग बॉस 20’च्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान याने सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. एखाद्या व्यक्तीच्या लूक किंवा कामावरून तिचा अपमान करणाऱ्या कमेंट्स करू नयेत, असं त्याने ट्रोलर्सना सुनावलं होतं.
सलमान खानच्या याच भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सुनील पाल म्हणाले, सलमान खान याला स्टार बनवण्यात प्रेक्षकांचा मोठा वाटा आहे. लोकांनी त्याच्या (सलमान खान) चित्रपटांना पसंती दिली आणि वर्षानुवर्षे त्याच्यावर प्रेम केलं, त्यामुळेच तो आज मोठा स्टार आहे, असं सुनील पाल यांनी म्हटलं. एवढंच नव्हे तर सुनील पाल यांनी सलमानसोबतच शाहरुख खान आणि इतर मोठ्या सेलिब्रिटींनाही बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची आवड समजून घेण्याचा सल्ला दिला.
पहिले बंद करा बिग बॉस
भाईजान, पहिले ‘बिग बॉस’ बंद करा, असं यावेळी सुनील पाल यांनी थेट सलमान खानला उद्देशून म्हटलं. हा ‘गटर शो’ असल्याची टीका करत या शोमध्ये वादग्रस्त वर्तन करणाऱ्या काही व्यक्तींना मोठं व्यासपीठ आणि लोकप्रियता मिळत, असं मतही पाल यांनी व्यक्त केलं. या शोमधील काही स्पर्धक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे किंवा आक्षेपार्ह वर्तनामुळे चर्चेत असतात. मात्र, ‘बिग बॉस’सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्ममुळे त्यांना प्रसिद्धी आणि स्टारडम मिळतं, असा आरोप सुनील पाल यांनी केला.
या शोमध्ये सहभागी असलेले लोकं समजासाठी चुकीचं दर्शवतात, त्यांनी टीकेला सामोरं जाण्यास तयार असलं पाहिजे. तसंच सलमान खान विविध मुद्द्यांवर आपल्या सोयीनुसार भूमिका बदलतो, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
केबीसीवरही केली होती टीका
एखाद्या रिॲलिटी शोवर किंवा मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींवर टीका करण्याची सुनील पाल यांची ही पहिलीच वेळ नाही. काही काळापूर्वी त्यांनी टीव्हीवरचा सर्वात मोठा क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’ आणि या शोचे होस्ट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) यांच्यावरही टीकास्त्र सोडलं होतं. KBC च्या सेटवरून कॉमेडिअन गौरव कपूर आणि गौरव गुप्ता या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला होता, तोच पाहन सुनील पाल भडकले.त्यांनी एका व्हिडीओद्वारे आपला संताप व्यक्त केला. केबीसी मेकर्स आणि अमिताभ बच्चन यांनाही पाल यांनी खडेबोल सुनावले होते. शोमध्ये शिवीगाळ करणाऱ्या लोकांना बोलावू नका, असं मी केबीसीच्या निर्मात्यांना बऱ्याच काळापासून सांगतोय, असं पाल म्हणाले होते. “हे लोक तुमच्या कार्यक्रमात का येतात?” असा सवालही त्यांनी विचारला होता.